पावसच्या कातळावर वर्षभर फुलतो पडवळचा मांडव...

सुधीर विश्‍वासराव
बुधवार, 26 जुलै 2017

पावस - आंबा लागवड व भातशेती करीत असताना आपण कायम कामात राहता यावे आणि ओसाड कातळाला न्याय देता यावा याकरिता कोकणात फक्त एकाच हंगामात लागवड होत असताना लोकांना वर्षभर पडवळ उत्पादन करता यावे यासाठी पावसच्या कातळावर प्रयोगशील शेतकरी चंद्रकांत शेडगे यांनी गेली २० वर्षे तीन हंगामात लागवड करून पडवळ उत्पादनाचा प्रयोग यशस्वी केला आहे.

पावस - आंबा लागवड व भातशेती करीत असताना आपण कायम कामात राहता यावे आणि ओसाड कातळाला न्याय देता यावा याकरिता कोकणात फक्त एकाच हंगामात लागवड होत असताना लोकांना वर्षभर पडवळ उत्पादन करता यावे यासाठी पावसच्या कातळावर प्रयोगशील शेतकरी चंद्रकांत शेडगे यांनी गेली २० वर्षे तीन हंगामात लागवड करून पडवळ उत्पादनाचा प्रयोग यशस्वी केला आहे.

कोकणामध्ये जून महिन्यात पडवळचे मांडव घालण्याची पद्धत आहे. गणपती, पितृपंधरवडा काळात पडवळाची भाजी खाण्याची ग्रामीण भागात आजही पद्धत आहे. पडवळ उत्पादनाला व्यावसायिक स्वरूप प्राप्त होण्याकरिता वर्षभर उत्पादन झाले पाहिजे, हे ध्यानात घेऊन शेडगे यांनी आंबालागवड व भातपिकाबरोबर कातळावर पडवळ लावण्याचा प्रयोग केला.

गावठी बियाणे वापरून चार एकरात तीन हंगामात लागवड केली. पहिल्या लागवडीचे उत्पन्न संपत असताना दुसरीचे उत्पन्न सुरू. दुसऱ्या टप्प्याचे संपताच तिसऱ्या टप्प्याचे सुरू अशी साखळी तयार केल्यामुळे काढणी सत्र सुरू राहते. सुरुवातीला साऱ्या पडवळाचा लिलाव केला जाई; परंतु दर अनियमित असल्यामुळे मेळ बसत नव्हता. अखेर थेट विक्रीस सुरुवात केल्यामुळे सरासरी १० ते १५ रुपये किलोचा दर मिळू लागला. लागवडीपासून ४५ दिवसांनी फुलोरा येण्यास सुरुवात होऊन ६० व्या दिवसापासून काढण्यास सुरुवात होऊन थेट बाजारपेठ मिळते. साधरणपणे दर चार दिवसांनी एक तोडणी अशा एकूण १५ तोडण्या होतात. अशा तऱ्हेने एकरी अडीच टन उत्पादन होते. कायमस्वरूपी मजूर उपलब्ध होत नसल्याने मी आणि माझा भाऊ व कुटुंब यात सहभागी होऊन काम करीत असल्यामुळेच एवढी वर्षे लागवडीतून उत्पन्न घेत आलो. हे चार एकरावरील पडवळ लागवडीचे क्षेत्र ओलिताखाली आणल्यानंतर उर्वरित भागात आंबा, नारळ लागवड करण्यात आली आहे.

वर्षभरात तीनवेळा लागवड 

हंगामात १५ वेळा तोडणी

थेट विक्रीमुळे नफा हाती

स्प्रिंकलरमुळे पाण्याची बचत
 

विंधन विहीर व विहिरीचा उपयोग करून कातळावर टाकी बांधून पाणी साठवले जाते. पाणी बचतीसाठी स्प्रिंकलरच्या साह्याने पाणी दिल्याने लागवड क्षेत्राला पुरते. दर्जेदार उत्पन्न वाढीसाठी सेंद्रिय खताचा वापर केला जातो. रोगप्रतिबंध करण्यासाठी १५ दिवसांनी फवारणी केली जाते.
- चंद्रकांत शेडगे, शेतकरी-पावस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pavas konkan news success padwal agriculture