पीएच.डी. अभ्यासकांचे कृतीतून मूर्त रूप

सुधाकर काशीद
बुधवार, 9 जानेवारी 2019

कोल्हापूर - हे दोघे समाजशास्त्र विषयात पीएच.डी. करीत आहेत. त्यांचा अभ्यास व लिखापढी सुरू असते, अभ्यासाचे एक अंग म्हणून पाहण्यासाठी ते दोघे रात्री शहरात फिरू लागले तेव्हा रस्त्यावरच्या लोकांसाठी केवळ पुस्तकातले ज्ञान उपयोगी नाही, हे त्यांच्या लक्षात आले आणि हे दोघे आणि अन्य मित्रांचा मुक्ता ग्रुप फिरस्त्यांसाठी आधारवड ठरले. सध्या कडाक्‍याची थंडी आहे. त्यांनी मित्रांच्या सहकार्याने दोन हजार २३० जणांना स्वेटर, चादर व पांघरूण दिले. पीएच.डी. कधीही होईल; पण फिरस्त्यांसाठी जे करता येईल ते करायचे, हेच त्यांनी ठरवून घेतले.

अभ्यासाच्या निमित्ताने दोघांनी रस्त्यावरचे जे आयुष्य पाहिले आहे, ते खूप भीषण आहे. जे रस्त्यावर झोपतात ते केवळ भिकारीच नसतात; तर नियतीच्या फेऱ्यात अडकलेले काही चांगलेही असतात, हे त्यांनी अनुभवले. एकेकाची जीवनकहाणी ऐकून त्यांची मती गुंग झाली. हे लोक केवळ थंडीने कुडकुडतात असे नव्हे, तर भुकेनेही कसे तळमळतात, हे ते रोज पाहताहेत आणि हे केवळ पाहून गप्प बसायचं नाही म्हणून धडपडताहेत.
विशाल मोरे व अमित पाटणकर या पीएच.डी. करणाऱ्या तरुणांची अभ्यासातून आणि कृतीतून वाटचाल सुरू आहे.

समाजातील विविध घटकांचा वेध घेण्यासाठी ते जेव्हा फिरू लागले, तेव्हा रात्री रस्त्याकडेला झोपणाऱ्यांचे आयुष्य त्यांच्या नजरेत आले. रस्त्याकडेला झोपणाऱ्यांकडे जाता-जाता करुणेचा कटाक्ष टाकणे त्यांना खूप सोपे वाटले; पण जेव्हा ते त्यांच्याशी बोलू लागले तेव्हा माणसांच्या जगण्याला किती वेगवेगळे पदर असतात हे त्यांच्या ध्यानी आले.

पांघरुणाअभावी प्लास्टिकच्या पिशवीत पाय घालून झोपणारे व डासापासून स्वतःला वाचविणारे अनेक जण त्यांनी पाहिले. वाहनांचा, हॉर्नचा झोपेत त्रास होऊ नये म्हणून कान घट्ट बांधूनच बहुतेक जण झोपतात, हे त्यांच्या ध्यानात आले. मुले व महिला जेथे आहेत ते साडीचा किंवा प्लास्टिकच्या कागदाचा आडोसा करून कसे झोपतात हे पाहून तर त्यांची झोपच उडाली. त्यांनी या लोकांसाठी जमेल तेवढे करायचे ठरविले. त्यामुळे विशाल व अमित यांनी मित्र अमोल महापुरे व इतर सहकाऱ्यांच्या मदतीने २३० जणांना स्वेटर व अंथरुण दिले. स्वेटर व अंथरुण घेताना जोडले जाणारे त्यांचे हात शब्दाशिवाय खूप वेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करून गेले.

आम्ही फार मोठे कार्य नक्कीच करीत नाही. गरिबांसाठी आपल्या परीने जे करता येईल ते केले तरच तो खरा अभ्यास ठरणार आहे. गरिबीवर केवळ पुस्तकी अभ्यास करून चालणार नाही. आमचे काम तुलनेत खूप तोकडे आहे; पण प्रत्येकाने थोडे-थोडे मनावर घेतले तर ते सोपे होईल.
- विशाल मोरे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ph D students social work