भारीच! नागरिकांना मिळणार घटकाभर विश्रांती; भांबुचीवाडीत बालचमूंनी जपली सामाजिक बांधिलकी

राजेश पाटील
Saturday, 14 November 2020

भोसगाव ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील भांबुचीवाडी (हनुमाननगर) हे छोटेसे गाव ढेबेवाडी-जिंती रस्त्यालगत वसलेले आहे. गावातील बहुसंख्य नागरिक नोकरी-व्यवसायनिमित्ताने मुंबईला वास्तव्यास असतात. तेथील बाल गणेश मंडळांनी सामाजिक, धार्मिक उपक्रमातून सहभाग कायम ठेवला असून, अनेक नवनवीन उपक्रमांद्वारे सामाजिक बांधिलकी जपली आहे.

ढेबेवाडी (जि. सातारा) : ग्रामस्थ व प्रवाशांची उन्ह-पावसात सुरू असलेली गैरसोय दूर करण्यासाठी भांबुचीवाडी (हनुमाननगर, ता. पाटण) येथील बाल गणेश व शिवप्रेमी मित्र मंडळाने पुढाकार घेत तेथे ढेबेवाडी-जिंती रस्त्यालगत पिकअप शेड उभारले असून, मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपत राबविलेल्या उपक्रमाचे नागरिकांतून कौतुक होत आहे. 

भोसगाव ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील भांबुचीवाडी (हनुमाननगर) हे छोटेसे गाव ढेबेवाडी-जिंती रस्त्यालगत वसलेले आहे. गावातील बहुसंख्य नागरिक नोकरी-व्यवसायनिमित्ताने मुंबईला वास्तव्यास असतात. तेथील बाल गणेश मंडळ व शिवप्रेमी मित्र मंडळाद्वारे युवक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी सामाजिक, धार्मिक उपक्रमातून सहभाग कायम ठेवला असून, अनेक नवनवीन उपक्रमांद्वारे सामाजिक बांधिलकी जपली आहे. गावाबाहेर रस्त्यालगत पावसात व उन्हातान्हात वाहनांच्या प्रतीक्षेत बसणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी अलीकडे त्यांनी पिकअप शेड उभारणीचा निर्णय घेत त्यानुसार तत्काळ कार्यवाहीसुद्धा केली. त्यासाठी अनेक मदतीचे व सहकार्याचे हातही पुढे आले. 

Diwali Festival 2020 : साताऱ्यात झेंडूचा भाव चारशे पर्यंत जाणार?

अवघ्या सात दिवसांत पिकअपशेड उभारून त्यालगत लोखंडी अँगल वापरून स्वतंत्र बाकडेही तयार करण्यात आले असून, प्रवाशांसह सकाळी व सायंकाळी मराठवाडी धरण परिसरात व्यायामास जाणाऱ्या परिसरातील नागरिकांनाही तेथे घटकाभर विश्रांती घेता येणार आहे. या सुविधेच्या उद्‌घाटनप्रसंगी सरपंच काशिनाथ कदम, अण्णासाहेब काळे, शिवाजी पाटील, श्रीमती मगर, मंडळाचे अध्यक्ष वसंत मराठे, अजय कदम आदींसह पदाधिकारी, ग्रामस्थ, युवक कार्यकर्ते उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपत राबविलेल्या उपक्रमाचे नागरिकांनी या वेळी कौतुक केले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pickup Shed Erected At Bhambuchiwadi Satara News