‘आजोबांच्या गोष्टी’त रमले नातवंडं

वैशाली भुते
सोमवार, 4 डिसेंबर 2017

पिंपरी - आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीत शहरी भागातील लहान मुलेमुली आजी-आजोबांच्या प्रेमाला पारखी झाली आहेत; तर दुसऱ्या बाजूला नोकरी- शिक्षणाच्या निमित्ताने मुले, सुना, नातवंडे परदेशी स्थायिक झाल्याने ज्येष्ठ नागरिक एकाकी पडत आहेत. कुटुंबातील हरवत चाललेला जिव्हाळा, तुटत चाललेली नाळ आणि त्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्‍नांना आता सामाजिक स्वरूप येऊ लागले आहे. हा सांधा जोडण्यासाठीच भोसरीतील सामाजिक कार्यकर्त्या नमिता टिकारे यांनी ‘आजोबांच्या गोष्टी’ हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.

पिंपरी - आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीत शहरी भागातील लहान मुलेमुली आजी-आजोबांच्या प्रेमाला पारखी झाली आहेत; तर दुसऱ्या बाजूला नोकरी- शिक्षणाच्या निमित्ताने मुले, सुना, नातवंडे परदेशी स्थायिक झाल्याने ज्येष्ठ नागरिक एकाकी पडत आहेत. कुटुंबातील हरवत चाललेला जिव्हाळा, तुटत चाललेली नाळ आणि त्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्‍नांना आता सामाजिक स्वरूप येऊ लागले आहे. हा सांधा जोडण्यासाठीच भोसरीतील सामाजिक कार्यकर्त्या नमिता टिकारे यांनी ‘आजोबांच्या गोष्टी’ हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. नातवंडांना आजी-आजोबांचे प्रेम मिळावे आणि ज्येष्ठांना नातवंडांचा सहवास मिळावा, हा त्यामागील उद्देश असला, तरी ज्येष्ठांच्या आयुष्यातील एकाकीपण दूर व्हावे, हादेखील त्यामागील उद्देश आहे. 

आकुर्डीतील कुटे वृंदावन सोसायटीत नमिता टिकारे यांनी ‘आजोबांच्या गोष्टी’ हा उपक्रम राबविला. त्यात सोसायटीतील ज्येष्ठांनी अत्यंत उत्साहाने सहभाग नोंदविला. नातवंडांच्या सहवासाने भारावून गेलेले आजोबा पाहायला मिळाले. एरवी केवळ टीव्ही, मोबाईलवर कार्टून स्वरूपात गोष्टी पाहून पुरत्या वैतागलेल्या बच्चे कंपनीनेही आजोबांकडून ऐतिहासिक, पौराणिक, बोधपर गोष्टी ऐकल्या. विविध विषयांवर चर्चा रंगल्या. केवळ सोशल मीडियावरून माहिती ‘शेअर’ करणाऱ्या पिढीने थेट आजोबांबरोबर काही गोष्टी शेअर केल्या. विनोदी प्रसंग, चुटकुले, कविता, गाणी अशा विविध प्रकारे हास्यकल्लोळ रंगला. गप्पांना उधाण आले आणि वारंवार भेटण्याचे ‘प्रॉमिस’ घेऊन सर्व चिमुकल्यांनी आजोबांना बाय बाय केले.

पालक म्हणाले... 
आजच्या जीवन पद्धतीमुळे मुलांना हवा तितका वेळ देता येत नसल्याचा अपराधीभाव आमच्या मनामध्ये असतो. अनेकदा इच्छा असून मुलांच्या आजीआजोबांसह एकत्र राहता येत नाही. त्यामुळे मुलांची आपल्या कुटुंबाशी नाळ कशी जोडणार हा प्रश्‍न असतो. मात्र, या उपक्रमाने आमची ही काळजी दूर केली, अशा भावना अनेक पालकांनी बोलून दाखविल्या. 

ज्येष्ठांनी सहभागी व्हावे : टिकारे
मी मूळची ग्रामीण भागातील. मात्र, शहरात आल्यानंतर सर्वप्रथम मला विभक्त कुटुंब पद्धती खटकली. त्यातून हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. हे उपक्रम शहरातील अनेक सोसायट्यांमध्ये घेता येऊ शकतात. मात्र, त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घ्यायला हवा. वृंदावन सोसायटीतून या उपक्रमाची सुरवात केली. ज्येष्ठ नागरिकांना या उपक्रमात निःसंकोचपणे सहभागी व्हावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या नमिता टिकारे यांनी केले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri news children Grandfather namita tikare