चिंचवडमधील गोखले वृंदावन झाले ‘नंदनवन’

संदीप घिसे
सोमवार, 2 एप्रिल 2018

पिंपरी - चिंचवडगाव येथील गोखले वृंदावन सोसायटीमधील ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेत कचऱ्यापासून खत निर्मिती, सौर ऊर्जेचा वापर, वीज बचत, पावसाच्या पाण्याची साठवण, सुरक्षिततेसाठी सीसी कॅमेरे, इमारतींचे सेफ्टी ऑडिट, रंगरंगोटी, मुलांसाठी बागेमध्ये खेळणी आणि वृक्षारोपण आदी उपक्रम राबविले. पक्षांच्या किलबिलाटाने येथील सकाळ होत असल्याने सोसायटीचे नंदनवन झाले आहे.

पिंपरी - चिंचवडगाव येथील गोखले वृंदावन सोसायटीमधील ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेत कचऱ्यापासून खत निर्मिती, सौर ऊर्जेचा वापर, वीज बचत, पावसाच्या पाण्याची साठवण, सुरक्षिततेसाठी सीसी कॅमेरे, इमारतींचे सेफ्टी ऑडिट, रंगरंगोटी, मुलांसाठी बागेमध्ये खेळणी आणि वृक्षारोपण आदी उपक्रम राबविले. पक्षांच्या किलबिलाटाने येथील सकाळ होत असल्याने सोसायटीचे नंदनवन झाले आहे.

कचऱ्यापासून खतनिर्मिती
गोखले वृंदावन सोसायटीची स्थापना २००७ मध्ये झाली असून १५९ सदनिका आहेत. प्रत्येक सदनिकाधारक गेल्या दोन वर्षांपासून ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करून देतात. ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती केली जात असून त्याचा वापर सोसायटीच्या परिसरातील आंबा, फणस, पेरू आदी फळांचे ४० मोठे वृक्ष, फुलझाडे आणि रोपांसाठी केला जातो. तसेच परिसरातील झाडांच्या पालापाचोळ्यातूनही खतनिर्मिती केली जाते, असे सोसायटीचे अध्यक्ष दिलीप तासे यांनी सांगितले.

सौरऊर्जेमुळे ६५ टक्‍के बचत
पूर्वी सोसायटीच्या परिसरातील वीज आणि बोअरवेलच्या पंपाचे बिल २४ ते २५ हजार रुपये येत असे. आता परिसरात एलईडी लावले असून बोअरवेलसाठी सौरऊर्जेचा वापर केला जातो. यामुळे बिलात ६५ टक्‍के बचत झाली, असे सोसायटीचे खजिनदार मकरंद वैद्य व सदस्य आशुतोष कुलकर्णी यांनी सांगितले.

सुरक्षिततेकडेही लक्ष
सोसायटीमधील रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी परिसरात चोवीस तास सुरक्षारक्षक नियुक्‍त केले आहेत. याशिवाय २४ सीसी कॅमेरे बसविले असून त्याची कंट्रोल रूमही तयार केल्याचे सोसायटीचे सदस्य किरण गडसिंग आणि योगेश आंबेकर यांनी सांगितले. तसेच स्ट्रक्‍चरल ऑडिटही करून घेतले असून रंगरंगोटीही केल्याचे सोसायटीचे सदस्य विलास जगताप, वसंत रानडे यांनी सांगितले. स्ट्रक्‍चरल ऑडिट करणारी शहरातील एकमेव सोसायटी असल्याचा दावा सदस्य प्रसाद कुलकर्णी, सोमनाथ टेंबुलकर यांनी केला आहे.

पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर 
इमारतींच्या टेरेसवरील पहिल्या दोन पावसाचे पाणी सोडून देण्यात येते. त्यानंतरच्या पावसाच्या पाण्याची साठवणूक टाक्‍यांमध्ये करून त्याचा वापर केला जातो. यामुळे पाण्याच्या वार्षिक बिलातही कपात झाल्याचे सोसायटीचे सचिव सदानंद केळकर व हर्शल गुळवणी यांनी सांगितले.

सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम
सोसायटीत स्वातंत्र दिन, प्रजासत्ताक दिन, कोजागरी पौर्णिमेला संगीत सभा, गणेश जयंती, फन फेअर, गणेशोत्सव आदी सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात, असे सोसायटीच्या सदस्या अनिता शेठ व प्रमिला पाटील यांनी सांगितले.

आदर्श सोसायटी पुरस्कार
खासदार श्रीरंग बारणे सोशल फाउंडेशनचा आदर्श सोसायटी पुरस्कार २०१८ या सोसायटीला मिळाल्याचे सोसायटीचे तज्ज्ञ सदस्य सुभाष कर्णिक व दत्तात्रेय पडवळ यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri news chinchwad gokhale vrundavan society