आदिवासी पाड्यावर "एक दिवस आनंदाचा' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

टाकवे बुद्रुक - आदिवासी पाड्यांवरील दिवाळी येते तशी जाते, तिचा उत्साह तोकडाच असतो. शेतीची कामे व शेतमजुरीत दिवस उगवतो आणि मावळतो. मग कधी उटणे लावून अंघोळ नाही की दारात सुबक रांगोळ्यांचे ठिपके नाहीत; पण आता हे दिवस पालटू लागले आहेत. आदिवासी पाड्यांवर सामुदायिक दिवाळी साजरी करायला वेगवेगळ्या संस्था, संघटना पुढे सरसावल्या आहेत. 

अशीच दिवाळी दहा दिवस आधीच आंदर मावळातील कळकराई आदिवासी पाड्याने अनुभवली. पाड्यांवरील महिला व पुरुषांची लगबग होती. चिमुकल्यांचा किलबिलाट सुरू होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. हे वेगळे समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होते. निमित्त होते कल्याण येथील "सक्षम युवा प्रतिष्ठान'ने राबविलेल्या "एक दिवा आनंदाचा' या दिवाळी फराळ उपक्रमाचा. प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आकाशकंदिलांनी सजवली. कळकराईतील 47 कुटुंबांसोबत दिवाळी साजरी केली. 

कळकराई गाव डोंगराच्या कुशीत वसलेले आहे. कशेळे (नेरळ) येथून 14 किलोमीटर व जाधववाडीच्या पुढे साडेचार किलोमीटर उंच, अशा डोंगरावर ही वस्ती आहे. पायपीट करीत कार्यकर्त्यांनी कळकराई गाठली. स्थानिकांना प्राथमिक गरजेची जिन्नस आणायला सात किलोमीटर पायी प्रवास करावा लागतो. हे पाहून एक दिवा आनंदाचा या उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम पार पडला. सक्षम युवा प्रतिष्ठानचे सचिव अक्षय वाणी यांनी शिक्षण, आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले. अध्यक्ष श्रीपाद खोल्लम यांच्यासह त्यांच्या भूषण, सौरभ, प्रीती, प्रज्ञा, स्वप्नील, अक्षय, माधवी, नितीन, गणेश, शीतल, आदिती, करण, मंदार, ममता, संतोष या मित्रांनी योगदान दिले. प्रत्येक कुटुंबाला पणत्या, रंग, पांढरी रांगोळी, उटण्याची पाकिटे, मिठाईचे पाकीट, कंदील आणि फराळाचे वाटप केले. माजी सरपंच लक्ष्मण कावळे यांनी आभार मानले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri news diwalid adivasi Pada