तरुणींच्‍या आकांक्षांचे ‘उडाण’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

८० टक्के मुली शेतकरी कुटुंबातील
शेतकरी आत्महत्या हा सध्याचा मोठा सामाजिक प्रश्‍न आहे. त्यामुळे आमच्या या प्रकल्पातील ८० टक्के मुली अल्पभूधारक, शेतीपूरक व्यावसायाशी निगडित कुटुंबातील आहेत. या प्रकल्पासाठी आलेल्या सहाशे ते सातशे अर्जाच्या छाननीनंतर घरोघरी जाऊन पाहणी शहानिशा करून या ४० मुलींची निवड केली असल्याचेही सावंगीकर यांनी सांगितले. 

पिंपरी - कौटुंबिक गरिबी, जबाबदाऱ्या आणि शैक्षणिक असुविधांमुळे ग्रामीण भागातील मुलींची शालेय गळती ठरलेलीच. या प्रतिकूल परिस्थितीमुळे कित्येक हुशार, होतकरू मुलींना दहावीमध्ये चांगले गुण मिळूनही पुढील शिक्षण घेता येत नाही. शिकून सवरून आकाशाकडे झेप घेण्याची इच्छा बाळगाणाऱ्या या मुली मग ‘चूल आणि मूल’ या चक्रव्यूहात अडकून पडतात. हेच पारंपरिक चक्रव्यूह भेदून मुलींचे सबलीकरण करण्याच्या दृष्टीने  चिंचवडमधील ‘एसकेएफ’ कंपनीने ‘उडाण’ हा महत्त्वाकांक्षी ‘सीएसआर’ (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिब्लिटी) प्रकल्प हाती घेतला आहे. 

या प्रकल्पांतर्गत कंपनीने मराठवाड्यातील आठ मागास जिल्ह्यातील तब्बल ४० गरीब- गरजू विद्यार्थिनींची निवड केली आहे. ८५ ते ९० टक्‍क्‍यांहून अधिक गुण 

मिळवून दहावी उत्तीर्ण झालेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील या मुली आहेत. या मुलींचा केवळ शैक्षणिक खर्च उचलण्याऐवजी शिक्षणासाठी पूरक बाबींचा प्रकल्पात विचार केला गेला आहे. त्यामध्ये मुलींची महाविद्यालयील- ट्यूशन फी, प्रवास खर्च, हॉस्टेल, मेस, शैक्षणिक साहित्याचा समावेश आहे. दहावी- बारावीपर्यंतच्या शिक्षणासह त्यापुढील उच्च शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी कंपनीने उचलली आहे. दहावी-बारावीचे दोन वर्षे आणि त्यापुढील चार वर्षे असा सहा वर्षांचा हा प्रकल्प असून, दरवर्षी ४० याप्रमाणे सहा वर्षांत अडीचशे मुलींचे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. त्यासाठी दोन ते अडीच कोटी रुपयांचा ‘सीएसआर’ निधीची तरतूद करण्यात आली आहे. 

याबाबत कंपनीचे ‘सीएसआर’ प्रमुख श्रीकांत सावंगीकर म्हणाले, ‘‘संपूर्ण देश बदलण्याची क्षमता आजच्या मुलींमध्ये आहे. ग्रामीण भागातही हुशार मुलींचे प्रमाण मोठे आहे. मात्र केवळ आर्थिक परिस्थितीमुळे त्या पुढे येऊ शकत नाही. त्यांच्या पंखांना बळ देण्यासाठीच आम्ही हा प्रकल्प हाती घेतला आहे. आठ जिल्ह्यांमधील ८८५५ गावांतील सर्वेक्षणातून आम्ही या मुलींची निवड केली आहे.’’

प्रकल्पाची वैशिष्ट्ये...
वर्षातून चार वेळा प्रशिक्षण शिबिर
मुलींच्या सर्वांगीण विकासावर भर
तज्ज्ञांमार्फत स्टडी स्कील प्रशिक्षण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri news girl farmer daughter