माउंट किलीमांजरोवर शिवजयंती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

सेव्हन समीटची सुरवात
किलीमांजरो मोहिमेनंतर जगातील सेव्हन समीटपैकी माउंट एव्हरेस्ट, माउंट एल्ब्रूस शिखरेही सर करणार आहोत, असे तिघांनीही सांगितले. 

पिंपरी - जगातील सर्वोच्च सात शिखरांपैकी एक असलेल्या आफ्रिकेतील पाच हजार ८९५ मीटर उंचीच्या ‘माउंट किलीमांजरो’ पर्वताच्या माथ्यावर सह्याद्रीचे मावळे गिर्यारोहक अनिल वाघ, क्षितिज भावसार, रवी जांभूळकर १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करून मूर्तीवर अभिषेक करणार आहेत. ज्येष्ठ गिर्यारोहक सुशील दुधाणे आणि उद्योजक सूर्यकांत शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम आखली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. 

वाघ, जांभूळकर म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव सर्वदूर पोचवावे व युवकांनी साहसी क्रीडा प्रकारात यावे यादृष्टीने ही मोहीम आखली आहे. दक्षिण आफ्रिकेतील टांझानिया येथील ‘माउंट किलीमांजरो’ मोहिमेसाठी सोमवारी (ता. १२) मुंबई येथून दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहेत.

त्यासाठी सहा दिवस लागतात. चढाई करताना तीन आणि उतरताना दोन मुक्काम केले जाणार आहेत. शिखरावर जाताना साडेचार किलो वजनाची आणि दोन फूट उंचीची शिवरायांची मूर्तीही नेणार आहे. शिवजयंतीच्या दिवशी माथ्यावर पोचल्यावर तेथे शिवरायांच्या मूर्तीवर अभिषेकही करणार आहेत.’’

भावसार म्हणाले, ‘‘या मोहिमेतील सर्व ऐतिहासिक क्षणांचे ड्रोनमधून चित्रीकरण करणार आहे. मोहीम यशस्वी झाल्यावर त्याचे चित्रीकरण यू-ट्यूबवर प्रदर्शित करणार आहोत.’’

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलात कर्मचारी म्हणून वाघ कार्यरत असून त्यांनी आत्तापर्यंत हिमालयातील भागीरथी, गंगोत्री, आयलंड शिखरे सर केली आहेत. तसेच लिंगाणा सुळका अवघ्या २२ मिनिटांत चढून २३ मिनिटांत उतरण्याचा विक्रमही त्यांनी केला आहे. चिखली येथील जांभूळकर बांधकाम व्यावसायिक असून ते परदेशी मोहिमेत प्रथमच सहभागी होणार आहेत. क्षितिज सिनेमॅटोग्राफर म्हणून व्यवसाय करतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri news pune news mount kilimanjaro shivjayanti