अध्यात्म, राष्ट्रप्रेमातून सांधली पाचशे कुटुंबे

मिलिंद वैद्य
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

पिंपरी - अध्यात्माकडे जाण्याचा मार्ग म्हणजे सत्संग. यातून एकेक माणूस जोडला जातो हे खरे; पण, एखादी व्यक्ती पुन्हा भेटतेच असे नाही. चिंचवडच्या भारत सत्संग मंडळाने मात्र तब्बल पाचशे कुटुंबे केवळ अध्यात्माच्याच नव्हे; तर, राष्ट्रभक्तीच्या सत्संगाद्वारे परस्परांशी जोडण्याचा अनोखा उपक्रम राबविला आहे. त्यांच्या या उपक्रमाला उणीपुरी दहा वर्षे झाली असून, आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी हे सर्वजण एकमेकांना भेटत असतात.

भारत सत्संग मंडळाकडून प्रत्येक शनिवारी आरती व सत्संगाचा कार्यक्रम होतो. आध्यात्मिक मार्गाने देवदेवतांच्या स्मरणाबरोबरच भारतमातेचा गजर, उठावणी आदी कार्यक्रम केले जातात. त्यामुळे उपस्थितांमध्ये देव, धर्माबरोबरच राष्ट्राविषयीही प्रेम वाढीस लागते, असा मंडळातील सदस्यांचा अनुभव आहे.

आज भौतिक सुविधा मिळवूनही माणूस सुखापासून वंचित आहे. समाजात चिंतेचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत केवळ अध्यात्मच मनाला शांती देऊ शकते. पण ते करताना कुटुंब, समाज आणि राष्ट्र या क्रमाने परिवर्तन घडविण्याच्या उद्देशाने दहा वर्षांपूर्वी प्रशांत हरहरे, संजय भंडारी आणि काही मित्रांनी एकत्र येऊन सत्संग मंडळाची स्थापना केली. त्यांना वामन वैद्य, श्रीकांत जोशी, व्यंकटेश कुलकर्णी, आशा देशमुख, दीपलक्ष्मी दांडेकर, शर्वरी फडके आदींनी साथ दिली. 

एका सदस्याच्या घरी हा सत्संग होतो. शनिवारी (ता. २३) या मंडळाच्या उपक्रमाला दहा वर्षे पूर्ण होऊन ५६३ वा सत्संग पार पडला. विशेष म्हणजे येथे सर्वजण स्वेच्छेने सहभागी होतात. कोणाला जबरदस्ती नाही. आता या मंडळाची ख्याती पुणे, पिंपरी चिंचवडसह इतर शहरांतही पोचली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri pune news bharat satsang mandal