अपंग विद्यार्थ्याची भरारी

अपंग विद्यार्थ्याची भरारी

पिंपरी - ‘स्त्रीला क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता म्हटले जाते’, ते चुकीचे नाही. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही आपल्या दोन बहुअस्थिविकलांग मुलांना शिक्षण देणाऱ्या आशा जाधव यांची जिद्द पाहिल्यावर त्याची प्रचिती येते. अस्थिविकलांगतेबरोबरच ‘पिंजरा’ या असाध्य आजारामुळे शरीराची संपूर्ण वाढच खुंटलेल्या स्वप्नीलच्या बारावीतील यशामुळे या मायमाउलीची करुणकथा समोर आली. केवळ स्वप्नीलच नाही, तर त्याच्यासारखाच बहुविकलांग असलेला त्याचा लहान भाऊही दहावीच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहे. पण गरिबी आणि मुलांच्या अपंगत्वाचे दु:ख कुरवाळण्याऐवजी त्याच्यावर मात करणाऱ्या आशाताई निराळ्याच. 

अठरा विश्‍वे दारिद्य्र असलेल्या आशा आपले पती श्‍यामराव आणि चार अपत्यांसह पिंपळे सौदागर-रहाटणी येथे राहतात. पिंपरीतील महात्मा फुले महाविद्यालयातूून ५७ टक्के गुणांनी उत्तीर्ण झालेला स्वप्नील हा त्यांचा सर्वांत थोरला मुलगा. तर त्या पाठच्या साहील यानेदेखील यंदाची दहावीची परीक्षा दिली आहे. अन्य दोन भावंडेही अनुक्रमे दहावी आणि पाचवीमध्ये शिक्षण घेत आहेत.

हे कुटुंब मुळचे नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्‍यातले. वीस वर्षांपूर्वी रोजगाराच्या शोधात ते पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल झाले. श्‍यामराव यांनी बिगारी काम हाती घेतले. तर आशाताईंनी घरकामांमधून संसाराला हातभार लावण्यास सुरवात केली. दरम्यान, स्वप्नीलचा जन्म झाला. जन्मत: निरोगी असणाऱ्या स्वप्नीलमध्ये वयाच्या पहिल्याच वर्षी अस्थिव्यंगाची लक्षणे दिसून आली. त्याची अवघी वाढच खुंटली. उपचारासाठी त्या अनेक ठिकाणी फिरल्या. मात्र यश आले नाही. स्वप्नीलपाठोपाठ जन्मलेला साहिलही याच आजाराचा बळी ठरला. घरची गरिबी; त्यात मुलांची विकलांगता यातून आशाताई पुरत्या कोलमडल्या. पण स्वप्नील- साहीलची हुशारी आणि शिक्षणातील आवड पाहून आशाताईंनी त्यांना शिकवण्याचा निर्णय घेतला. जागचे हलूही न शकणाऱ्या त्या दोघांची त्या हातावर उचलून घेऊन शाळेत ने-आण करू लागल्या. सासर आणि माहेरच्यांच्या दबावामुळे आणखी दोन मुलांना जन्म द्यावा लागला. तेथून मात्र त्यांची फरफट सुरू झाली. तुटपुंज्या उत्पन्नातून संसाराचा गाडा हाकताना अनंत अडचणी आल्या. कधी खाण्यापिण्याची भ्रांत तर कधी घरमालकाचा जाच. मात्र मुलांना शिकवण्याची चिकाटी त्यांनी सोडली नाही. आईचे कष्ट सार्थकी लावण्यासाठी स्वप्नील आणि साहीलनेही मेहेनत घेतली. स्वप्नीलच्या यशाच्या रूपातून या मायलेकरांना कष्टाचे जणू फळच मिळाले. परंतु त्यांची परीक्षा अजूनही संपलेली नाही. पुढील शिक्षणाचे आव्हान तर आहेच, पण भक्कम छताअभावी त्यांची खूपच आबाळ होत आहे.

घराचे स्वप्नही धूसर
आजच्या स्पर्धेच्या युगात हातपाय धडधाकट असणारेही थोड्याशा अपयशाने खचून जातात. परंतु पिंपरीतील स्वप्नील जाधवने आपल्या बहुविकलांगतेवर मात करत बारावीमध्ये मोठे यश मिळविले. त्याला पुढे आणखी शिकायचे आहे. संगणक क्षेत्रात करिअर करायचे आहे. त्यांच्याप्रमाणेच साहीललाही यशाची खात्री आहे. मात्र, त्यांच्या पंखांना समाजाकडून बळ हवे आहे. अपंग पेन्शन योजनेसाठी त्यांनी अनेक वेळा उंबरठे झिजविले आहेत. मात्र कायम निराशाच पदरी आली. पंतप्रधान आवास योजनेत अर्ज भरला असला, तरी तेथील अटी आणि शर्तींमुळे घराचे स्वप्नही धूसर झाले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com