मुलांच्या जाणिवा समृद्ध करणारे खेळ घर

ओंकार धर्माधिकारी
मंगळवार, 29 जानेवारी 2019

कोल्हापूर - शहरांमधील काही वस्त्यांमध्ये खेळ घरांचा उपक्रम चालवला जातो. इथे येणारी मुले ही कष्टकरी कुटुंबातील असतात. कोणाचे वडील मोलमजुरी करतात, तर कोणाचे गवंडी काम करतात. येथे खेळाच्या माध्यमातून मुलांची आकलन क्षमता विकसित केली जाते. खेळामुळे मुले इथे रमतात आणि अभ्यासही करतात. त्यातून त्यांचे शालेय गुण वाढतात, तसेच व्यक्तिमत्त्वाचा विकासही होतो. शहरात २३ ठिकाणी ही खेळ घरे सुरू आहेत.

कष्टकऱ्यांच्या वसाहतीमध्ये दिवसभर काम करून आलेली मंडळी घरामध्ये विसावलेली असतात. घरामध्ये कोणी फारसे शिक्षित नसल्याने या मुलांचा अभ्यास घेणारेही कोणी नसते. त्यामुळे मुलांना शाळा, अभ्यास याची गोडी लागत नाही. शाळेत जाण्यापेक्षा आईवडिलांबरोबर कामावर जाणेच त्यांना हवेहवेसे वाटू लागते. त्यातच जर ही मुले नापास झाली तर त्यांची शाळा सुटलीच म्हणून समजायचे. अशा मुलांची आकलन क्षमता विकसित व्हावी. त्यांना लिहिणे, वाचण्याची आवड निर्माण व्हावी, यासाठी २००३ साली खेळ घर ही संस्था सुरू झाली.

संध्याकाळी उपनगरातील कष्टकऱ्यांच्या वसाहतीमधील एका खोलीत ही खेळ घरे चालतात. इथे त्यांना सोप्या पद्धतीने गणित, भाषा हे विषय शिकवले जातात. पणत्या बनवणे, कागदी वस्तू बनवणे याचे प्रशिक्षण दिले जाते. कसे वागायचे, कसे बोलायचे, स्वच्छता कशी ठेवायची, याचेही धडे या खेळ घरातून दिले जातात. वर्षभर केलेल्या प्रयत्नातून मुलांची आकलन क्षमता अधिक विकसित झालेली दिसते.

मुले सफाईदारपणे वाचन आणि लेखन करतात. त्यामुळे त्यांच्या शाळेतील गुणवत्ताही सुधारते. विशेष म्हणजे, त्यांना शिक्षणाची गोडी लागते. यामुळे शाळा सोडण्याचे प्रमाणही घटते. सध्या राजेंद्रनगर, संभाजीनगर, दौलतनगर, तीनबत्ती चौक येथे सुमारे २३ खेळ घरे सुरू आहेत. येथे कोणतीही फी आकारली जात नाही. जुई कुलकर्णी, विदुला स्वामी, स्मिता माटे या ही संस्था चालवतात. या खेळ घरांमुळे ज्ञानाची कवाडे उघडी
झाली आहेत.

मुलांच्या जाणिवा समृद्ध करून त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याचे काम खेळ घर करते. येथे शिक्षिकाही स्थानिक वस्तीमधील असतात. त्यामुळे मुला-मुलींना सुरक्षित वाटते. त्यांना शिक्षणाची गोडी लावून स्वतःच्या पायावर उभे करणे हा खेळ घराचा उद्देश आहे. 
- सुमेधा कुलकर्णी,
संचालिका, खेळ घर.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: play house for boys mind development special story