पोलिसांनी गल्लोगल्ली फिरून शोधले माता- पित्यास 

राजेंद्रकृष्ण कापसे 
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

वारजे माळवाडी -  कर्वेनगर येथील बिजली चौकात दोन वर्षांचा मुलगा सापडला. मात्र, त्याला नाव, पत्ता व आई- वडिलांचे नाव सांगता येईना. त्यामुळे पोलिसांनी त्याला गल्लोगल्ली फिरवून, त्याच्या माता- पित्याचा शोध घेतला. 

सायंकाळी सातच्या सुमारास रस्त्याच्या कडेला अंधारात रडत असलेला मुलगा अमर भोसले व राजू शेख या पोलिसांना आढळला. त्यांनी आसपास त्याच्या आई- वडिलांचा शोध घेतला. परंतु, कोणीही आढळले नाही. पोलिसांनी मुलाला शांत करून, त्यास चॉकलेट व बिस्कीट खायला दिले. 

त्याला नाव व पत्ता विचारला. परंतु तो फक्त "आई,' "पप्पा' एवढेच बोलत होता. त्यामुळे त्यांनी त्याला कर्वेनगर पोलिस चौकीत आणले. तिथे त्याचे फोटो काढून पोलिस ठाणे व इतर वॉट्‌सअप ग्रुपवर मुलाबाबतची माहिती पाठवली. 

त्यानंतर मार्शल अमर भोसले व पोलिस शिपाई राजू शेख व पुंडलिक जुंबड, पोलिस नाईक बालारफी शेख हे कर्वेनगर परिसरात मुलास घेऊन त्याच्या आई वडिलांचा शोध घेऊ लागले. कर्वेनगर गल्ली नं. चारजवळील दुकानदाराने सांगितले, की हा मुलगा याच गल्लीतील आहे. त्याचे आई वडील व नातेवाईक त्याचा शोध घेत आहेत. त्यानंतर पोलिसांनी बरीच शोधाशोध केल्यानंतर मुलाचे वडील गणेश तात्याराव जाधव व आई अश्विनी जाधव (रा. सातपुते गल्ली, कर्वेनगर) हे भेटले. त्यांना पाहताच मुलाने "आई- पप्पा' असे म्हणत त्यांच्याकडे झेप घेतली. मुलगा दिसल्यानंतर अश्विनी जाधव यांचा इतका वेळ रोखून धरलेला अश्रूंचा बांध फुटला. त्यांनी त्याला छातीशी कवटाळून "यश' "यश' असे म्हणत पटापट त्याचे पापे घेतले. हा प्रसंग पाहणाऱ्याच्या डोळ्यातही आनंदाश्रू तरळले. त्यानंतर पोलिसांनी गणेश व अश्विनी जाधव यांना मुलासह कर्वेनगर पोलिस चौकीत आणले. कायदेशीर सोपस्कार पार करून सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण उकिर्डे व फौजदार अमोल कदम यांनी यशला त्याच्या आई- वडिलांच्या ताब्यात दिले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police searched the parents of the missing boy