पूजा चव्हाण - मल्लखांब ते अशोकस्तंभ!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

परळी - शेतकरी कुटुंबात वाढलेल्या पूजा चव्हाणमध्ये काही तरी वेगळे करून दाखविण्याची जिद्द, चिकाटी होती. त्यातच तिला मल्लखांबाची साथ मिळाली आणि मल्लखांबावर वर्चस्व मिळविता-मिळविता तिने आपल्या खांद्यावर अशोकस्तंभही लावण्याचा ध्यास ठेवला. आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून परळी भागातील आणि मल्लखांब क्षेत्रातील पहिली महिला पोलिस उपनिरीक्षक होण्याचा मान तिने मिळविला. 

कारी... परळी खोऱ्यातील कोपऱ्यातील गाव. दिवसभर शेतात राबायचं अन्‌ त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर संसार चालवायचा. 

शेतीशी एकनिष्ठ झालेले वडील आणि संसाराला हातभार लावावा यासाठी अंगणवाडी शिक्षिकेच्या माध्यमातून मदत करणारी आई, ही पूजाची प्रेरणास्थाने. पूजाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कारीत झाले.

साताऱ्याच्या यशवंतराव चव्हाण सायन्स महाविद्यालयातून उच्च माध्यमिक, तर शिवाजी कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण तिने पूर्ण केले. प्राथमिक शाळेत असताना तिला शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त मल्लखांबपटू माया पवार या शिक्षिकेचे मार्गदर्शन मिळाले आणि या गावातील अनेक मुलींचे आयुष्यच बदलून केले. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आणि धाडस निर्माण झाले. जिद्द आणि चिकाटी निर्माण झाली.

मल्लखांबातील अनेक खेळाडू तयार झाले आणि आज विविध क्षेत्रात ते कार्यरत आहेत. 

मल्लखांबातील अपघातानंतही तिने सराव सुरूच ठेवला. लहानपणापासूनच प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची तयारी आणि जिद्दीमुळे तिने मल्लखांब ते अशोकस्तंभ (पीएसआय) अशी मजल मारली. या यशाबद्दल सर्वच स्तरातून तिचे कौतुक होत आहे. परळी भागातील पहिली महिला पीएसआय झाल्याचा सर्वांनाच अभिमान आहे.

राष्ट्रीय पातळीवरही गुणवत्तेची चुणूक
पूजा ही मल्लखांबातील राष्ट्रीय पातळीवर गुणवत्ता मिळविलेली खेळाडू. सात राष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने भाग घेतला आहे. राष्ट्रीय स्तरावर तिने दहा सुवर्णपदके मिळविली. तिच्या या कारकिर्दीची दखल घेत तिला जिल्हा क्रीडा परिषदेने २०११-१२ मध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठीचा गुणवंत खेळाडू पुरस्कार देऊन गौरविले. 

Web Title: Pooja Chavan PSI SUccess Motivation