ट्रकचालकाची लेक झाली पीएसआय

ट्रकचालकाची लेक झाली पीएसआय

कळमेश्‍वर - तालुक्‍यातील कोहळी येथील पूनम पांडुरंग कुंभरे एमपीएससी परीक्षेत आदिवासींमधून राज्यात सहावी आली आहे. वडील ट्रकचालक तर आई निरक्षर, शासकीय  योजनेत मिळालेल्या घरकुलाचे डोक्‍यावर छत, बीएसस्सी संगणक शास्त्राची पदवी घेतल्यावरही हाती मोबाईल नसलेल्या व कोणत्याही प्रकारची शिकवणी न लावता पूनमने मिळविलेले यश प्रेरणादायी ठरले आहे. 

नुकत्याच जाहीर झालेल्या एमपीएससीच्या निकालात राज्यातून १४ आदिवासी विद्यार्थी यशस्वी झाले असून त्यात पूनमने सहावे स्थान मिळविले आहे. पूनमच्या शिक्षणात सुरुवातीपासूनच  अनेक अडचणी आल्या. दहावीपर्यंत कुडाच्या घरात राहणाऱ्या व दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करून पूनमने दहावीत ७५ टक्‍के गुण मिळविले. घरची परिस्थिती व भावांच्या शिक्षणाच्या खर्चामुळे कधी बसने तर कधी पायदळ प्रवास करून बारावी सायन्समध्येही चांगले गुण  मिळविले. काटोलच्या नबीरा महाविद्यालयात प्रवेश घेताच कुटुंबासाठी काहीतरी करून दाखविण्याची जिद्द होती. वडील चौथी, आई अशिक्षित आहे. त्यामुळे मार्गदर्शन करणारे घरात कुणीच  नव्हते. 

मात्र, दोन मामा पोलिस खात्यात तर एक सैन्यात असल्याने त्यांच्याप्रमाणेच खाकीतली नोकरी करावी, अशी घरच्यांची इच्छा असल्याने पीएसआय बनण्याचा निर्णय घेतला व पदवी परीक्षा पूर्ण करून २०१६ पासून काटोल येथील विशेश्वरी ग्रंथालयात राज्यसेवेचा अभ्यास सुरू केला. २०१७ मध्ये पीएसआयच्या जागांसाठी जाहिरात आली. वर्षभराचा अभ्यास व आत्मविश्‍वासाच्या बळावर पूर्व, मुख्य व मौखिक परीक्षा दिल्यात. पहिल्याच प्रयत्नात पूनम उत्तीर्ण झाली. 

‘सेल्फ स्टडी’वर सर्वाधिक भर
घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे गावापासून ग्रंथालयापर्यंत जाण्यासाठीही पैसे नसायचे. त्यामुळे कुठलेही शिकवणीवर्ग लावण्याचे कधीही स्वप्नही बघितले नाही. ‘सेल्फ स्टडी’चा पर्याय वापरून प्रामाणिकता, जिद्द, सातत्य व संयम बाळगून दररोज १२ तास अभ्यास केला. कधी-कधी टेलिग्रामची मदत घेतली. मात्र, कुठलीही ॲकेडमी किंवा समाजमाध्यमांचा वापर केला नाही. हे सुरू असताना इतर परीक्षाही दिल्यात. मात्र, खाकी वर्दीचे स्वप्न पूर्ण करण्याचा मानस तिने पूर्णत्वास आणला.

कमी शिकलेले असतानासुद्धा वडिलांनी सर्व भावंडांना समान शिक्षण दिले. त्यासाठी त्यांनी होईल ते कष्ट उपसले. कधी तर त्यांना व्याजाने पैसे काढण्याची वेळ आली. तरीसुद्धा कुठलाही विचार न करता जिद्द सोडली नाही. नेहमीच मोठ्या मुलाप्रमाणे वागणूक मिळाली. त्यांच्या या परिश्रमाचे चीज झाले आहे.
- पूनम कुंभरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com