‘कृतज्ञतेतून’ घडले गरिबाघरचे ५०० इंजिनिअर

प्रशांत रॉय
रविवार, 20 मे 2018

आम्हाला कुणीतरी मदत केली आणि आम्ही येथवर पोहोचलो. हा संस्कार पुढच्या पिढीला कृतीतून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपण फक्त द्यायचे. घ्यायचे नाही, हीच आमची शिकवण आहे.
- ई. झेड. खोब्रागडे, वसतिगृहाचे एक विश्‍वस्त आणि माजी सनदी अधिकारी.

नागपूर - निवारा आणि अन्न मिळाले की शिक्षणाद्वारे कुणीही चांगल्या पदावर पोहोचू शकतो. गरिबीतून शिकून मोठ्या पदावर गेलेल्या काही मित्रांनी हे हेरले. याच कृतज्ञतेतून सुरू झाले ‘शिक्षण-छत्र’. बिकट परिस्थितीतील शेकडो मुलांना इथे आश्रय मिळाला. त्यातून ५०० च्यावर इंजिनिअर आणि उच्चपदस्थ अधिकारी घडले.

बुटीबोरी नागपूर येथील ‘कृतज्ञता’ वसतिगृह गरीब पण ध्येयधुंद तरुणांसाठी आधारवड झाले आहे. हे वसतिगृह साकारण्याची कथाही प्रेरणादायी आहे. १९९८ मध्ये येथील कॉलेजच्या प्राध्यापकांच्या षष्ठीनिमित्त माजी विद्यार्थ्यांनी ‘कृतज्ञता’ सोहळा ठेवला. यातील बव्हंशी विद्यार्थी वरोरा परिसरातील गरीब घरचे होते. त्यांच्या शिक्षणाच्या १९७०-७२ च्या काळात काही प्राध्यापकांनी राहण्या-जेवणाची मदत केली. त्यातून डॉक्‍टर व इंजिनिअर झाले. काही शासकीय सेवेत गेले. या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांप्रती ही ‘कृतज्ञता’ होती. या ऋणातून उतराईसाठी जमा करून षष्ठीला ६० हजारांची रक्कम भेट दिली. पण प्राध्यापक महोदयही कमालीचे निःस्वार्थी. त्यांनी पदरचे ४० हजार टाकले आणि एक लाखाची थैली परत केली. यातून त्यांच्यात मंथन झाले. एखाद्या वेळेस एखाद्यालाच मदत करण्यापेक्षा सातत्याने अनेकांना मदतीचा हात द्यावा ही संकल्पना साकारली. यातून ‘कृतज्ञता’ वसतिगृह जन्मास आले. शासकीय मदत न घेता मिळालेल्या दानातून आणि पेपरची रद्दी विकून सद्या हे वसतिगृह चालविले जाते. गोर-गरीब व वंचितांना मोफत, तर इतर होतकरू युवकांना अल्प पैशांमध्ये राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: positive story E Z khobragade Former IAS officer