
'असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास, तुका म्हणे' या तुकाराम महाराजांच्या वचनाचा प्रत्यय बरेचदा येतो.
पाटना : आयुष्यात संघर्ष केल्यावरच यशाचा मार्ग सापडतो. विनासंघर्ष यश मिळणे दुरापास्तच आहे. परिस्थिती कितीही वाईट असो, जिद्द आणि चिकाटी असेल तर असाध्य सुद्धा साध्य करता येते. 'असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास, तुका म्हणे' या तुकाराम महाराजांच्या वचनाचा प्रत्यय बरेचदा येतो. याची अनेक उदाहरणे आपल्याला सातत्याने पहायला मिळतात. अशाच एका उदाहरणाची सध्या देशभरात चर्चा आहे.
बिहारच्या एका छोट्या गावातील बालबांका तिवारी नावाच्या व्यक्तीने संघर्षाच्या जोरावर उत्तुंग यश प्राप्त केलं आहे. भारतीय सैन्य अकॅडमीमधून प्रशिक्षण घेतल्यानंतर ते सैन्यात मोठ्या पदावर रुजू झाले आहेत. मात्र, हा प्रवास वाटतो तितका निश्चितच सोपा नव्हता. इथवर या मुक्कामाप्रत त्यांना पोहोचण्यासाठी खूपच खस्ता खाव्या लागल्या आहेत. त्यांना लोखंडाच्या कारखान्यात कामगार म्हणून काम करावं लागलं. पण त्यांनी आपलं स्वप्न सोडलं नाही. आणि आज याच कष्टाच्या जोरावर ते सैन्यात वरिष्ठ अधिकारी पदापर्यंत पोहोचले आहेत.
हेही वाचा - 'काही घटकांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न'
बिहार जिल्ह्यातील भोजपूरमधील संदुरपुर बरजा या छोट्या गावात राहणारे बालबांका तिवारी एका गरीब कुटुंबातून आले आहेत. त्यांचं कुटुंब शेतीवर आधारित आहे. लहानपणापासून घरातल्या कामात हातभार लावत त्यांनी दहावीपर्यंतच आपलं शिक्षण गावातल्या हायस्कूलमध्येच पूर्ण केलं. बालबांका सांगतात की, 2008 मध्ये दहावीला ते आपल्या शाळेतील टॉपर होते. मात्र, असं असतानाही त्यांना आपलं शिक्षण सुरु ठेवायला संघर्ष करावा लागला. याचं कारण असं की त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. त्यांच्या शिक्षणाचा खर्च कुटुंबाला उचलणे कठीण होते. अशातच ते आपल्या एका नातेवाईकाकडे उडीसामधील राउरकेलामध्ये गेले.
तिथे त्यांनी सरकारी इंटरकॉलेजात प्रवेश घेतला. तसेच ते लोखंडाच्या फॅक्टरीत कामदेखील करु लागले. लोखंड कापण्यापासून ते लोखंड वितवळण्यापर्यंतची कामे त्यांना करावी लागत असत. जवळपास सात महिने तिथे काम केल्यावर ते एका नमकीनच्या फॅक्टरीत कामासाठी गेले. तिथे त्यांना सेल्समॅन म्हणून काम करावं लागलं. घरोघरी तसेच अनेक छोट्या दुकानांमध्ये जाऊन ते नमकीन विकू लागले. 2011 मध्ये राउरकेलाच्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच त्यांनी ट्यूशन घ्यायलाही सुरवात केली. यातून त्यांना पैसे मिळायला लागल्यावर त्यांनी सेल्समॅनची नोकरी सोडून दिली.
बालबांका सांगतात की, 2012 मध्ये ते सैन्यात जवान म्हणून भर्ती झाले. त्यानंतर आर्मी कॅडेट कॉलेज (ACC) मध्ये प्रवेशाची तयारी त्यांनी केली. आणि यामाध्यमातूनच त्यांनी आर्मी ऑफिसर बनण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलं.