यू-ट्यूबवरून तनिष्का शिकली नृत्य

गोविंद हटवार
रविवार, 13 मे 2018

तनिष्काचा इंस्ट्रूमेंटल सेन्स चांगला आहे. त्यामुळे तिला गिटार वादनाचे प्रशिक्षण दिले. बॉलिवूडची गाणी तिला आवडतात. शिवाय लोकनृत्यातही ती पारंगत आहे. ग्लोबल एज्युकेशन ट्रस्टतर्फे घेण्यात आलेल्या ब्रेन क्वेस्ट कॉन्टेस्टमध्ये तिने बाजी मारली. 
-शुभांगी चंबोले, तनिष्काची आई

नागपूर - सोशल मीडियाचा वापर कुणी कसा करावा, हा ज्याचा त्याचा प्रश्‍न. हुडकेश्‍वर येथील तनिष्का संजय चंबोले हिने यू-ट्यूबवरून नृत्य शिकून विविध स्पर्धांत विजयश्री खेचून आणली. हेडराडून येथील नुकत्याच झालेल्या बहुभाषिक नाटक, नृत्य आणि संगीत स्पर्धेत तिने भाग घेतला. राष्ट्रीय पातळीवरील या मोहन्स रंग महोत्सवात सोलो मॉडर्न डान्समध्ये तिने तिसरे पारितोषिक पटकावून नागपूरची मान उंचावली.  

तनिष्का लहान असताना घरी नृत्य करायची. आईने तिच्यातील कलागुण हेरून तिला प्रोत्साहन दिले. यू-ट्यूबवरील नृत्य दाखविले. ते पाहून ती नृत्यातील बेसिक शिकली. कॉन्व्हेंटमध्ये शाळेत ती नृत्य सादर करायची. तिथून तिने भरारी घेतली. ती सात वर्षांची असताना पुण्यात राष्ट्रीयस्तरावरील नृत्य स्पर्धा होणार असल्याचे कळले. आई-वडिलांनी तनिष्काला साथ दिली. पुण्यात तिने सादर केलेला मुजरा भाव खाऊन गेला. इथूनच तिला आणखी समोरे जाण्याची प्रेरणा मिळाली. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. कोलकाता, कटक, मथुरा आदी काही ठिकाणी राष्ट्रीय नृत्य स्पर्धांमध्ये भाग घेतला. बक्षिसे, गौरवपत्र प्राप्त केले. नागपुरात झालेल्या नृत्य स्पर्धेत झी टीव्हीच्या जज गीता कपूर यांनी ट्रॉफी देऊन तिचा गौरव केला. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे बऱ्याच स्पर्धांमध्ये ती भाग घेऊ शकत नाही. तिने नृत्यासाठी विशेष प्रशिक्षण घेतले नाही. यू-ट्यूबवरून घरीच तयारी केली. अजूनही तिची तयारी सुरू आहे. 

तनिष्का हुडकेश्‍वर मार्गावरील साईनगरात राहते. आदर्श संस्कार विद्यालयात शिकते. तिने आता आठवीत प्रवेश घेतला. सातवीत तिला ९० टक्के गुण आहेत. ती केवळ अभ्यासातच हुशार नाही, तर खेळ, नृत्य यातही तिला आवड आहे. शाळेत ती क्रिकेटही खेळते. भविष्यात आर्किटेक्‍चर होण्याचे तिचे स्वप्न आहे.  

Web Title: positive story Tanishka learned dance on Youtube