भाजी विक्रेत्या आशाताईंचा मुलगा झाला ‘सीए’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

वडिलांच्या निधनानंतर आईने केलेला संघर्ष लहानपणापासून पाहत आलो. त्याची जाणीव ठेवून चांगले काही तरी करण्याची जिद्द उराशी होती. या कालावधीत विद्यार्थी सहायक समितीत असताना अनेक गोष्टी शिकता आल्या. त्याचा फायदा सीएचा अभ्यास करतानाही झाला.
- नारायण केंद्रे

पुणे - वडिलांच्या निधनानंतर आईने भाजीपाला विकून परिस्थितीशी दोन हात केले. आईने घेतलेल्या कष्टाचे चीज करीत जिद्द अन्‌ मेहनतीच्या जोरावर नारायण केंद्रे हा सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट- सीए) बनला आहे. मूळचा लातूर जिल्ह्यातल्या आनंदवाडीचा असलेल्या नारायणने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत हे यश मिळविले आहे.

अवघ्या पावणेदोन वर्षांचा असताना नारायणचे पितृछत्र हरपले. पतीच्या मृत्यूमुळे तिन्ही मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी नारायणची आई आशाताईंवर आली. मुलांचे पालनपोषण करण्यासाठी अहमदपूर येथील भाजीमंडईत त्यांनी भाजीपाला विकण्याचा निर्णय घेतला. बारावीपर्यंत नारायणही आईसमवेत भाजीविक्री करायचा. मात्र, २०१३ च्या सुमारास उच्च शिक्षणासाठी तो पुण्यात आला. बृहन्‌महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) त्याने प्रवेश मिळविला आणि त्याचा शैक्षणिक प्रवास सुरू झाला. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करून तो नेट परीक्षेतही उत्तीर्ण झाला. ग्रामीण भागात राहूनही यशाचे शिखर गाठणारा नारायण तरुणांसाठी प्रेरणास्रोत बनला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Positive story Vegetable vendor Ashtai son CA