परसबागेतील कुक्कुटपालनामुळे वाढला आर्थिक नफा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

नागालॅंडमधील आदिवासी शेतकऱ्यांना परसबागेतील कुक्कुटपालन फायदेशीर ठरले आहे. येथील सरकारने परसबागेतील कुक्कुटपालनाला चालना दिली आहे. यासाठी हैदराबाद येथील कुक्कुट संशोधन संचालनालयाने विकसित केलेल्या वनराजा आणि श्रीनिधी या सुधारित कोंबड्यांचे वाटप आदिवासी शेतकऱ्यांना करण्यात आले. 

या सुधारित जाती गावरान कोंबड्यांसारख्याच दिसतात; परंतु त्यांची वाढ, रोगप्रतिकारशक्ती आणि अंडी  देण्याची क्षमता चांगली आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत सुधारित जातीच्या  कोंबड्यांना मागणी वाढू लागली आहे. परसबागेतील कुक्कुटपालनामुळे आदिवासी पट्ट्यातील कुटुंबांना प्रथिनयुक्त आहाराची उपलब्धता होऊ लागली आहे.

परसबागेतील कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी नागालॅंडमधील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्राने पुढाकार घेतला. या केंद्रातर्फे आदिवासी शेतकऱ्यांना वनराजा आणि श्रीनिधी या सुधारित कोंबड्यांच्या पिलांची उपलब्धता करून दिली. या केंद्राने नागालॅंड, आसाम, मणिपूर, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशातील १,३५४ शेतकऱ्यांना कोंबडीच्या सुधारित   जातीची पिले दिली. याचबरोबरीने परसबागेत कोंबड्यांचे व्यवस्थापन कसे ठेवायचे याबाबतही प्रशिक्षण दिले. त्यामुळे या कोंबड्यांची चांगली वाढ झाली. अपेक्षित अंडी उत्पादनही मिळू लागले.

पथदर्थी प्रकल्प - 
नागालॅंडमधील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्राने नागालॅंडमधील सतरा गावांमध्ये ‘पथदर्शी कुक्कुटपालन गाव` हा  प्रकल्प राबविला. सतरा गावांमधील ७३८ आदिवासी कुटुंबांना गेल्या वर्षभरात २५,३१९ सुधारित जातींच्या कोंबडी पिलांचा पुरवठा करण्यात आला. याचबरोबरीने परसबागेत कोंबड्यांच्या व्यवस्थापन, त्यांच्यासाठी निवारा, खाद्य नियोजन, लसीकरण याबाबत कुटुंबातील सदस्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. कुटुंबातील सदस्यांनी कोंबडी पिलांचे चांगले व्यवस्थापन ठेवल्याने त्यांची वाढ चांगली झाली. 

स्थानिक पातळीवर उपलब्ध होणाऱ्या घटकांपासूनच कोंबडी खाद्य तयार करण्यात आले. कोंबडी खाद्यामध्ये टॅपिओका, मका, तांदळाच्या कण्या, मका भरड्याचा वापर करण्यात आला. त्यामुळे खाद्यावरील खर्चात काही प्रमाणात बचत झाली. 

बहुतांश शेतकऱ्यांनी २.५ ते ३ किलो वजनाच्या कोंबड्यांची स्थानिक बाजारपेठेत विक्री केली. स्थानिक बाजारपेठेत ग्राहकांनी या कोंबड्यांना चांगली पसंती दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दरही मिळतो आहे. काही शेतकऱ्यांनी अंडी उत्पादनाच्या दृष्टीने श्रीनिधी कोंबड्यांचे संगोपन केले आहे. कारण या कोंबडीच्या अंड्यांना चांगला दर मिळतो. 

परसबागेतील कुक्कुटपालनातून चांगला आर्थिक नफा मिळू लागल्याने तरुण शेतकऱ्यांनी व्यावसायिक कुक्कुटपालनाच्या दृष्टीने प्रशिक्षण घेण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे पारंपरिक शेतीबरोबरीने कुक्कुटपालन उद्योगातून किफायतशीर नफा नागालॅंडमधील आदिवासी शेतकऱ्यांना मिळू लागला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Poultry Nagaland