शिक्षकाच्या दुर्दैवी निधनानंतर साता-यातील प्राथमिक शिक्षकांकडून संवेदनशीलतेचे दर्शन

दिलीपकुमार चिंचकर
Monday, 28 September 2020

शिक्षकांनी एकत्र येत आपल्या सहकाऱ्यांसाठी बांधिलकीने केलेल्या या प्रयत्नाचे विशेष कौतुक होत आहे.

सातारा : तालुक्‍यातील एका शिक्षकाच्या दुर्दैवी निधनानंतर अन्य सहकारी शिक्षकांनी एकत्र येत संवेदनशीलतेचे दर्शन घडविले. या सर्वांनी केवळ एका दिवसात मोठा निधी संकलित करत सहा ऑक्‍सिजन मशिन्ससह टेम्प्रेचर गन, ऑक्‍सिमीटर, तसेच अन्य सामग्रीची खरेदी केली.
 
सध्याच्या कोरोनाजन्य परिस्थितीचे आव्हान दिवसेंदिवस बिकट होत आहे. विशेषतः ऑक्‍सिजन मशिन उपलब्धतेबाबत समस्या निर्माण होत आहेत. त्यातून सातारा तालुक्‍यातील एका प्राथमिक शिक्षकावर नुकतीच दुर्दैवी मृत्यूची वेळ ओढविली. या पार्श्वभूमीवर गणेश दुबळे, दीपक भुजबळ, रमेश लोटेकर, शिवाजी भोसले या प्राथमिक शिक्षकांनी पुढाकार घेत निधी संकलनाबाबत आवाहन केले. त्याला शिक्षकवर्गातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. केवळ एका दिवसात 200 हून अधिक शिक्षकांनी हस्ते परहस्ते आपली रक्कम संबंधितांकडे सुपूर्द केली. त्यातून सहा ऑक्‍सिजन मशिन्स, 13 टेम्प्रेचर गन, ऑक्‍सिमीटर खरेदी करण्यात आले. जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग, पोवई नाक्‍यावरील प्राथमिक शिक्षक बॅंक, तसेच 11 पंचायत समित्यांमध्ये टेम्प्रेचर गनचे वितरण करण्यात आले.

साता-याच्या पाच युवकांवर दरोड्याचा गुन्हा; डाॅक्टरच्या मुलाचाही समावेश
 
प्रकाश बडदरे, उद्धव पवार, शशिकांत घाडगे, संतोष चव्हाण, संतोष लोहार, रणजित गुरव, संदेश जंगम, कचरनाथ शिंदे, चेतन तोडकर, महावीर तुपसमिंदर, सुशांत मोतलिंग, शहनाज तडसरकर, माहेश्वरी कोळेकर, रवींद्र कुंभार, विशाल जमदाडे, राहुल घाटे आदी शिक्षकांनी याकामी परिश्रम घेतले. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रभावती कोळेकर यांच्या हस्ते ही सामग्री संबंधितांकडे सुपूर्द करण्यात आली. शिक्षकांनी एकत्र येत आपल्या सहकाऱ्यांसाठी बांधिलकीने केलेल्या या प्रयत्नाचे विशेष कौतुक होत आहे. 

ही सेवा कोणाला? 

ही सेवा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या कुटुंबातील कोरोनाबाधित रुणाला मिळणार आहे. देणगीदार शिक्षकांना त्यात प्रथम प्राधान्य आहे. त्यासाठी डॉक्‍टरांचे शिफारसपत्र अथवा प्रिस्क्रिप्शन अनिवार्य आहे. मशिन घेऊन जाताना विहित नमुन्यातील अर्ज भरून देणे गरजेचे आहे. मशिन नेतेवेळी त्याची वापरण्याची पद्धत समजून घेणे गरजेचे आहे. मशिनसाठी कोणत्याही प्रकारचा मोबदला घेतला जाणार नसून, ही सेवा पूर्णपणे मोफत असेल.

ऑनलाइन शिक्षणात रयत शिक्षण संस्थेची मुसंडी!

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Primary Teachers Donated Six Oxygen Machine Satara News