मनोरुग्ण महिलेला मिळाला निवारा!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

राजगुरुनगर - रस्त्यावर फिरणाऱ्या एका मनोरुग्ण महिलेस महिलाश्रमामध्ये पोचविण्याच्या निमित्ताने राजगुरुनगरमधील काही सहृदय नागरिक पुढे आले आणि त्यातूनच निराधारांची सेवा करण्यासाठी हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन स्थापन करण्याचा निर्णय झाला.

राजगुरुनगर - रस्त्यावर फिरणाऱ्या एका मनोरुग्ण महिलेस महिलाश्रमामध्ये पोचविण्याच्या निमित्ताने राजगुरुनगरमधील काही सहृदय नागरिक पुढे आले आणि त्यातूनच निराधारांची सेवा करण्यासाठी हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन स्थापन करण्याचा निर्णय झाला.

राजगुरुनगर येथे पुणे- नाशिक महामार्गावर, पेट्रोलपंपासमोर रस्त्याच्या मधोमध एक बेवारस मनोरुग्ण महिला अनेक दिवसांपासून दुभाजकावर बसून असायची. रात्रीसुद्धा तिथेच झोपायची. फाटक्‍या कपड्यांत आणि अत्यंत वाईट अवस्थेत राहताना खराब झालेले अन्न खायची. कचरा गोळा करायची. गाड्यांची वर्दळ, ऊन, वारा, पाऊस असतानासुद्धा ती तिथेच असायची. गावातील सहृदय लोकांनी एकत्र येऊन या महिलेला नगर येथील शिंगवे नाईक येथे घेऊन जाण्याचे ठरविले. या गावात बेवारस मनोरुग्ण महिलांसाठी डॉक्‍टर धामणे दांपत्य चालवीत असलेल्या ‘माउली सेवा प्रतिष्ठान’मध्ये दाखल करण्याचे ठरविले. त्यांनी या मनोरुग्ण महिलेला संस्थेत दाखल करण्यासंबंधीच्या आवश्‍यक त्या परवानग्या मिळवल्या. आर्थिक मदत गोळा केली. डॉ. राजेंद्र धामणे यांच्याशी चर्चा करून १२ ऑगस्टला स्वतः दहा- बारा जणांनी रुग्णवाहिकेतून जाऊन तिला सुखरूप आश्रमात दाखल केले.  कैलास दुधाळे, संतोष बारणे, पुष्पांजली मराठे, अर्चना गारगोटे, छाया दुधाळे, गणेश टाकळकर, सुनील वाळूंज, संपत गारगोटे, संतोष सांडभोर, दिलीप होले, उत्तम राक्षे, अमर टाटिया, बाळासाहेब सांडभोर, सुनील थिगळे, पी. टी. शिंदे, राजन जांभळे, शांताराम पिंगळे, राहुल मलघे, कैलास मुसळे, श्रीकांत खैरे, अनिल बारणे, दत्तात्रेय रुके, सुदाम कराळे, वामन बाजारे, मधुकर गिलबिले आदींनी या कार्यात सहभाग घेतला. या सर्वांनी आता हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य शिवऋण प्रतिष्ठानचे संस्थापक अक्षय मोहन बोऱ्हाडे यांच्या हस्ते २४ ऑगस्ट रोजी उद्‌घाटन करण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Psychiatric woman found shelter