बॉक्‍सर बनला राज्याचा मुख्य प्रशिक्षक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

माझे विद्यार्थी ‘बॉक्‍सिंग’ मध्ये नाव मिळवीत आहेत. माझ्या दृष्टीने मी आतापर्यंत केलेल्या कष्टाचे ते फळ आहे. हजारो बॉक्‍सिंग खेळाडू घडविण्याचे माझे स्वप्न आहे.
- बंडू गायकवाड, मुख्य प्रशिक्षक, महाराष्ट्र बॉक्‍सिंग असोसिएशन

पुणे - आई-वडील कष्टाची कामे करत होते, भावंडे जास्त असल्यामुळे बंडू पंढरीनाथ गायकवाड यांना हलाखीच्या परिस्थितीतच दिवस काढावे लागत होते. शाळा शिकतानाच, छोट्या भावामुळे ते ‘बॉक्‍सिंग’कडे आकर्षित झाले. परिस्थिती प्रतिकूल होती, पैशांच्या प्रचंड अभावामुळे खेळामध्ये पुढे जाण्यास असंख्य अडचणी येत होत्या. अशा परिस्थितीतही गायकवाड यांनी ‘स्टेट चॅंपियन’, ‘नॅशनल चॅंपियन’पासून ते ‘मिनी ऑलिंपिक चॅंपियन’चे विजेतेपदाचा मान मिळविला. 

प्रतिकूलतेशी ‘दोन हात’ करणारा हा ‘बॉक्‍सर’ आता ‘महाराष्ट्र बॉक्‍सिंग असोसिएशन’चे मुख्य प्रशिक्षक बनले. आता त्यांचे विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकू लागले आहेत. 

मातोश्री रमाबाई आंबेडकर रस्ता परिसरातील (ताडीवाला रोड) लोकसेवा तरुण मंडळाच्या परिसरामध्ये गायकवाड कुटुंबीय अनेक वर्षांपासून वास्तव्य करत आहे. ते मूळचे नगर जिल्ह्यातील बारडगाव येथील. कुटुंबीय पोटापाण्यासाठी पुण्यात आले आणि स्थायिक झाले. वडील पंढरीनाथ रेल्वेमध्ये ‘पार्सर पोटर’ म्हणून काम करत, तर आई हिराबाई सफाई कर्मचाऱ्यांच्या हाताखाली काम करत. छोट्या पत्र्याच्या खोलीमध्ये सहा बहिणी व चार भाऊ, असे दहा-बारा जणांचे कुटुंब कसेबसे राहत होते.

गायकवाड यांचा छोटा भाऊ अनिल महात्मा फुले शाळेतील बॉक्‍सिंगकडे आकर्षित झाला. अनिल यांनी गायकवाड यांनाही ‘बॉक्‍सिंग’ची गोडी लावली.
शिक्षण घेताना गायकवाड यांनी महात्मा फुले शाळेमध्ये सिलोन ॲन्ड्रुज यांच्याकडे ‘बॉक्‍सिंग’चे धडे गिरविले. त्याचवेळी घरोघरी पेपर टाकणे, ज्यूस बार अशा मिळेल, त्या ठिकाणची कामेही ते करत होते. चिकाटी, जिद्द व कष्टाच्या जोरावर गायकवाड एक-एक स्पर्धा जिंकत होते. राज्य पातळीवर ‘बॉक्‍सिंग चॅंपियन’चा मान त्यांनी पटकाविला. पुढे दिल्ली, चेन्नई, आसाम यांसारख्या ठिकाणी त्यांनी सुवर्णपदक पटकाविले. ‘बॉक्‍सिंग फेडरेशन कप’चे सुवर्णपदकही मिळविले. ‘‘छोट्या भावामुळे बॉक्‍सिंगकडे वळलो. आपल्या आवडीचे रूपांतर करिअरमध्ये करण्याचे ठरविले. अनेकदा पैशांअभावी अडचणी आल्या. मात्र जिद्द, चिकाटी होती. त्यामुळे अडचणी सोडवता येऊ लागल्या,’’ असे गायकवाड यांनी सांगितले. 

गायकवाड सध्या रेल्वे प्रशासनामध्ये कर्मचारी म्हणून काम करत आहेत. रेल्वेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मुलांना ‘बॉक्‍सिंग’चे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. महाराष्ट्र बॉक्‍सिंग असोसिएशनचे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही ते कार्यरत आहेत. गायकवाड यांनी घडविलेले असंख्य विद्यार्थी आता ‘बॉक्‍सिंग’मध्ये राज्य व राष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार मिळवित आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news bandu gaikwad state main boxer trainer