स्थलांतरितांच्या मुलांना "विद्यादीप'चा हात 

पांडुरंग सरोदे
शनिवार, 13 जानेवारी 2018

माझे वडील बांधकाम मजूर तर आई गृहिणी. रोजगारासाठी आमचे कुटुंब थेरगावमध्ये आले. तेव्हा वीटभट्टीजवळच स्थलांतरित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी "विद्यादीप सपोर्ट क्‍लास' विद्यार्थी घडवत होती. मीही त्यात सहभागी झाले. शिक्षण आणि विविध प्रकारचे खेळ, स्पर्धांमुळे आमच्या आयुष्यात बदल घडले. आत्मविश्‍वास आला. अभ्यासाची गोडी वाढली. आता मी "बीसीए'च्या तृतीय वर्षामध्ये शिकते, त्यासाठी संस्था मदत करते. 
- अश्‍विनी गायकवाड, माजी विद्यार्थीनी

पुणे - राज्याच्या खेड्यापाड्यापासून ते परराज्यातून हाताला काम आणि पोटाला अन्न मिळेल, या उद्देशाने दरवर्षी हजारो कामगार पुण्यात येतात. बांधकाम साइट किंवा वीटभट्टी, मिळेल तिथे ते काम करतात. मात्र, गाव बदलल्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची परवड होते. शाळेत कुठे घालायचे? शाळा सोडल्याचा किंवा जन्म दाखला कुठून आणायचा? एवढं करूनही भाषेचा अडसर! असे प्रश्‍न भेडसावतात. नेमके हेच ओळखून येरवड्यातील "इंडिया स्पॉन्सरशिप कमिटी'ने 22 वर्षांपासून स्थलांतरितांच्या मुलांना शाळेत जाण्यापूर्वी "विद्यादीप सपोर्ट क्‍लास'द्वारे सक्षम करण्याचे प्रयत्न चालवलेत. संस्थेच्या मदतीमुळे पंधरा वर्षांत आठ हजारांवर स्थलांतरित विद्यार्थी घडले. संस्था आजही आठ "विद्यादीप सपोर्ट क्‍लास'द्वारे शिक्षणाची गंगा वीटभट्ट्यांपर्यंत पोचवत आहे. 

महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांसह विविध राज्यांमधील गरीब व कष्टकरी पोटापाण्यासाठी पुण्यामध्ये येतात. हाताला काम आणि निवाऱ्यासाठी धडपड सुरू होते. काम मिळते. मात्र मुलांच्या शिक्षणाचे काय? हा प्रश्‍नच. एक म्हणजे भाषेचा अडसर आणि दुसरा किचकट व तितकीच निगरगट्ट व्यवस्थेची आडकाठी. यामुळे मुले शिक्षणापासून वंचित राहतात. त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी "इंडिया स्पॉन्सरशिप कमिटी' प्रयत्न करते. "शिक्षणासाठी वाचन, वाचनासाठी शिक्षण' या संकल्पनेनुसार संस्था काम करते. संस्थेच्या कार्यक्रम व्यवस्थापक क्रांती साळवे म्हणाल्या, ""वीटभट्टी आणि वस्त्यांमधील शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रारंभी पालकांशी संवाद साधतो. मुलांच्या शिक्षणाविषयी त्यांच्यात जागृती करतो. बहुतांश मुले हिंदी किंवा अन्य भाषिक असल्याने भाषेची अडचण येते. शाळेत प्रवेशापूर्वीच त्यांच्यामध्ये भाषेपासून अभ्यासापर्यंतची गोडी लावण्याचे काम "सपोर्ट क्‍लास' करते. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देते. त्यांच्या शाळा प्रवेशासाठी झटते. या उपक्रमात शिकलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत.'' 

पुण्याभोवती वाकड, ताथवडे, माण, रावेत, पुनावळे, डांगे चौक, पाषाण, नांदे-चांदे, गावडेवाडी परिसरात वीटभट्ट्या आहेत. तेथे महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील नागरिक काम करतात. तेथे 3 ते 14 या वयोगटांतील मुलांना "सपोर्ट क्‍लास'मध्ये पाठविण्यासाठी पालकांमध्ये जागृती करतो. शाळेमध्ये प्रवेशापूर्वी मुलांमधील भीती, न्यूनगंड दूर करण्यासाठी "सपोर्ट क्‍लास' प्रयत्न करते. हसत-खेळत शिक्षकवण्यावर भर असतो. खेळ व पौष्टिक आहार दिला जातो. पुण्यातील लक्ष्मीनगर, पांडवनगर, बर्माशेल, माणिकनगर, सुरक्षानगर आणि येरवडा येथेही संस्थेतर्फे शिक्षणाचे काम सुरू आहे. 

संस्थेस येणाऱ्या अडचणी 
मुलांना शाळांमध्ये दाखल करताना त्यांचा जन्म तारखेचा दाखला, शाळेचा दाखला आणि भाषा या तीन प्रमुख गोष्टींकडे पाहिले जाते. अनेकदा तिन्हींचाही अभाव असतो. शाळा प्रशासनही दुर्लक्ष करते. अशावेळी "शिक्षणाचा हक्क', "लहान मुलांचे अधिकार' आणि अन्य पर्यायी मार्गांचा अवलंब संस्था करते आणि विद्यार्थ्यांना शाळाप्रवेश मिळवून देते. मात्र, ही प्रक्रिया जिकिरीची व किचकट असल्याचे साळवे सांगतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news education Ashwini Gaikwad