कष्टकऱ्यांसाठी माणुसकीला पाझर!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

सातारा रस्त्यावर काम करणाऱ्या मजुरांसाठी काहीतरी करण्याची इच्छा सोसायट्यांतील नागरिकांनी व्यक्त केली. हा उपक्रम राबविल्यानंतर मजुरांच्या चेहऱ्यावरील आनंदाची लकेर पाहून सर्वांनाच समाधान वाटले. सर्वच सोसायट्यांना यातून प्रेरणा मिळाली असून, यापुढेही असे काम करण्याचा संकल्प आम्ही केला आहे.
-सचिन बोरा, सोसायटीधारक

पुणे - ज्यांचं सारं आयुष्यच वाटेला लागलेले असते ते वाटेवर काम करत असतात! रस्ते बनविण्यासाठी अनेकदा यांचे हात उपाशीपोटी राबत असतात. त्यांच्या पोटाची ना कुणाला चिंता ना फिकीर; पण रस्त्यावरचे हे वास्तव काही सहृदयी पुणेकरांनी जाणले अन्‌ माणुसकीचे दर्शन घडवत या कष्टकऱ्यांना सहकुटुंब भोजनाचा आनंद दिला. रस्त्यावर जेव्हा या माणुसकीला पाझर फुटला तेव्हा एक दिवस का होईना, या श्रमिकांनी तृप्ततेची ढेकर दिली.

पुणे- सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम गेल्या महिन्यापासून सुरू आहे. यासाठी पाऊस-उन्हामध्ये मजूर राबत आहेत. याच काळात दिवाळी असल्याने नागरिक खरेदीसाठी गर्दी करत आहेत. त्यामुळे या कष्टकऱ्यांच्या आयुष्यामध्येही आनंदाचे क्षण निर्माण करावे, या हेतूने येथील काही सोसायट्यांमधील नागरिकांनी पुढाकार घेतला. या कष्टकऱ्यांना भोजन देण्याचे नियोजन केले. यासाठी इंद्रप्रस्थ, जयतीर्थ, मनाली, कमला हेरिटेज, इंद्रलोक आदी सोसायटींच्या अश्‍वमेधनगर रहिवासी संघातर्फे वर्गणी गोळा करण्यात आली आणि इंद्रप्रस्थ सोसायटीत स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. टेबल खुर्चीसह भोजसाठी केलेली तयारी पाहून मजुरांची कुटुंबे भारावून गेली. गुलाबजामून, पुरीच्या भोजनाचा आनंद घेताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

या रस्त्याच्या कामाची जबाबदारी असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कारही या वेळी करण्यात आला. उपअभियंता राजेंद्र अर्धापुरे, कनिष्ठ अभियंता प्रकाश पवार, शिंगाडे, बीएसएनएलचे पोपटराव चव्हाण तसेच डॉ. संजय ललवाणी, निवृत्त पोलिस अधिकारी मारुतराव देशमुख, शिवाजी मराठा संस्थेचे सुरेश खरे, निवृत्त अभियंता प्रफुल्ल जोशी व सोसायट्यांचे प्रतिनिधी प्रदीप पाटील, प्रा. मोघे, प्रमोद पाटील,  नितीन खळेकर तसेच पदाधिकारी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news Humanity labour