कर्णबधिरांच्या सकारात्मक दृष्टिकोनासाठी "साद' 

मीनाक्षी गुरव
मंगळवार, 23 जानेवारी 2018

कर्णबधिर मुलांना शिकविणाऱ्या शिक्षिका म्हणून 25 वर्षे झाल्यावर विनया देसाई यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर शिक्षणापलीकडे जाऊन त्यांनी विशेष मुलांचे जीवन अधिक खुलविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. इच्छा असूनही श्रवणदोषामुळे जे प्रतिसाद देऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी त्यांनी "साद उपक्रम केंद्र' सुरू केले. या माध्यमातून त्यांनी आजवर पाचशेहून अधिक कर्णबधिरांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करून त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासालाही हातभार लावला आहे. समाजामध्ये "साद' उपक्रम यध्या परिवर्तनाची नांदी ठरत आहे. 

महर्षी शिक्षण संस्थेच्या एकात्म शिक्षण योजनेत देसाई यांनी 22 वर्षे शिक्षिका म्हणून काम केले. त्याआधी त्या स्पेशल स्कूलमध्ये काही वर्षे काम करत होत्या. परंतु, नोकरीची 25 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि कर्णबधिरांसाठी काम करण्याचे ठरविले. त्यातून "साद उपक्रम केंद्रा'ची निर्मिती झाली. देसाई म्हणतात, ""सुदृढ अवयव घेऊन आपण जन्माला येतो, ही भाग्याची गोष्ट आहे. पण, एखाद्या अवयवाचा उणेपणा घेऊन संपूर्ण जन्म काढणे आणि विशेष गरजा असलेल्या अपत्याचे संगोपन करणे कठीण आहे. म्हणून मुलांना आणि पालकांना "साद' घालण्यासाठी हे केंद्र सुरू केले.'' 

या केंद्राच्या साहाय्याने सर्व वयोगटांतील कर्णबधिरांवर "स्पीच थेरपी'चे अभिनव उपक्रम राबविले जातात. त्याबरोबरच कर्णबधिरांचे आणि पालकांचे समुपदेशन केले जाते. अर्थात, प्रत्येक मूल वेगळे असते, प्रत्येकाचा श्रवणदोषही वेगळा असतो आणि प्रत्येकाच्या विकासाचा वेगही वेगळा असतो, हे मान्य; पण या केंद्राद्वारे कर्णबधिरांच्या विकासाला मदत होईल, अशा उपक्रमांवर भर दिला जात असल्याचे देसाई यांनी सांगितले. कोथरूड येथील म्हातोबा मंदिराजवळ हे केंद्र सात वर्षांपूर्वी सुरू झाले असून, स्वानंद संस्था "साद' केंद्राचा कणा आहे. स्वानंद संस्थेच्या रंजना लोढा यांनी या केंद्रासाठी हॉल दिला आहे. 

प्रियांका दबडे ही चार वर्षांची असल्यापासून देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित होत आहे. आता ही "साद'मध्ये इतर मुलांना शिकविण्याचे काम करत आहे. निखिल आणि नेहा व्यवहारे या कलाकार दांपत्याचे जीवनही केंद्राच्या माध्यमातून अधिकाधिक फुलत आहे. निखिल नोकरी करतो, तर नेहा चित्रकलेचे धडे इतरांना देत आहे. श्रवण-वाचा प्रशिक्षण, नृत्य व योगासने वर्ग, अभ्यासवर्ग, शिबिरे, सहली, पालकांसाठी गायनवर्ग, समुपदेशन, कर्णबधिरांनी तयार केलेल्या वस्तूंचे विक्री प्रदर्शन हे उपक्रम केंद्रामार्फत राबविले जातात.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news Positive Attitude Maharishi Education Society