esakal | ३१ दिवस, पावणे चारशे तास आणि ४६ हजार पोळ्या
sakal

बोलून बातमी शोधा

३१ दिवस, पावणे चारशे तास आणि ४६ हजार पोळ्या

३१ दिवस, पावणे चारशे तास आणि ४६ हजार पोळ्या

sakal_logo
By
जागृती कुलकर्णी

धायरी - एकतीस दिवसांत पावणे चारशे तास काम करून ४६ हजार पोळ्या... हा विक्रम तिच्या नावावर नोंदवला गेलाय. तिची कहाणी आहे अन्नपूर्णेच्या जिद्दीची आणि आईच्या मायेची... आई मुलांसाठी किती अपार कष्ट करू शकते, हे राधा लोखंडे यांना भेटल्यानंतर जाणवते.

धायरीतील ‘देशपांडे स्वयंपाकघर’ येथे राधा या पोळ्या लाटण्याचे काम करतात. दररोज २५ ते ३० हजार पोळ्या येथून विविध ठिकाणी पुरविल्या जातात, चोखंदळ पुणेकरांना घडीच्या, मऊसूत पोळ्या आवडतात. पोळ्यांच्या कामात दर्जा, आकार, पोत, रंग कायम जपण्याची कसरत रोजच. मे महिन्यात राधा यांच्याबरोबर काम करणाऱ्या काहीजणी लग्नकार्य, मुलांना सुट्या म्हणून बाहेरगावी गेल्या. पण हजारो पोळ्यांची ऑर्डर तर कायम होती. एरवी रोज एक महिला आठशे ते हजार पोळ्या लाटते. राधा यांनी स्वयंपाकघराच्या संचालिका आरती देशपांडे यांना ‘मी करीन जास्त काम’ असे सांगून दिलासा दिला. किरकोळ शरीरयष्टीच्या, मनाची ताकद भरपूर असलेल्या राधा मग महिनाभर पदर खोचून कामाला लागल्या. पहाटे तीन वाजता कारखान्याची गाडी सगळ्या महिलांना आणायला जाते. साडेतीन वाजता सगळ्याजणींचे काम सुरू होते ते दुपारी एक वाजेपर्यंत संपते. राधा यांचा दिवस असा मध्यरात्री सुरू होतो. शिवाय न थकता पुन्हा दुपारी तीन ते सहा या वेळेत त्या लाटणे हातात धरतात. महिन्यात राधा यांनी जिद्दीने थोड्याथोडक्‍या नाही, तर ४६ हजार पोळ्या लाटल्या. म्हणजे रोज पंधराशेच्या आसपास ! स्वच्छतेचे, दर्जाचे सगळे निकष पाळून विस्तवासमोर सलग पोळ्या लाटणे सोपे नव्हते. राधा यांचा कामाचा झपाटा इतर महिलांनाही हुरूप देणारा ठरला.

आरती देशपांडे आणि त्यांचा मुलगा निर्मल यांनी राधा यांना पगाराव्यतिरिक्त दहा हजार रुपये बोनस दिला. निर्मल यांनी कौतुकाने समाज माध्यमात याची माहिती दिली. राधा यांना भेटायला गेले तेव्हा त्यांचे हात पाहिले. कामाने, परिस्थितीने श्रमलेले, कडक, पण ती बदलण्याची विलक्षण ताकद असलेले ! कुठून आलं बळ एवढं काम करण्याचं ? विचारल्यावर  डोळ्यातली पाण्याची रेघ पुसत राधा म्हणाल्या, ‘‘दोन मुलं आहेत. तुषार नववीला, नितीन सहावीत. दोन्ही मुलांनी चांगलं शिकून मोठं व्हावं असं वाटतं, जे करते ते त्यांच्यासाठी ! त्यांनी नाव काढलं तर, या कष्टाचं चीज होईल.’’ राधा यांच्यावर मुलांची जबाबदारी आहे, हे त्यांनी न सांगताच समजले. 

न कंटाळता रोज हजारांहून अधिक पोळ्या लाटणाऱ्या सगळ्याजणी अशीच छोटीमोठी स्वप्ने बरोबर घेऊन परिस्थितीशी झुंझतात. ४६ हजार पोळ्या लाटताना राधा यांना आपण कोणता विक्रम करतोय, याची जाणीव नव्हती, किंवा लाटण्यामुळे हाताला घट्टे पडल्याची तमा नव्हती... आहे फक्त मुलांच्या भविष्याची, शिकून मोठे होण्याची !

loading image
go to top