दुःखाआडून ते देतात जगण्याची ऊर्मी

रविवार, 14 जानेवारी 2018

एचआयव्ही बाधित मुलांना वयाच्या अठराव्या वर्षानंतर शिक्षण आणि नोकरीसाठी राज्य सरकारने धोरण तयार करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी दूर होण्यास मदत होईल. 
- प्रा. रवी बापटले 

पुणे - एखाद्याला एचआयव्ही झाल्याचे समजताच कुटुंबातील लोकही चार हात दूर राहतात. एचआयव्हीमुळे आई-वडील गेल्यानंतर बऱ्याचदा नातेवाईकही त्यांच्या एचआयव्ही बाधित मुलांना स्वीकारत नाहीत. मुलांवर आभाळच कोसळते. अशा संकटात त्यांचा सांभाळ कोण करणार? परंतु त्यांचा सांभाळच नव्हे, तर आयुष्य फुलवून लातूर येथील प्रा. रवी बापटले यांनी समाजासमोर आदर्श घालून दिला आहे.   

उंची कमी असल्यामुळे सैन्यात भरती होता आले नाही. त्यानंतर बापटले यांनी पत्रकारितेची पदवी घेतली. लातूरमध्ये पत्रकारिता सुरू केली. त्या वेळी एचआयव्ही तज्ज्ञ (स्व.) डॉ. प्रदीप उगिले, तसेच पत्रकार श्रीधर स्वामी, अभय मिरजकर, संजय स्वामी अशी काही मित्रमंडळी होती. डॉ. उगिले यांनी लातूरमध्ये १५ वर्षांपूर्वी एचआयव्ही बाधित रुग्णांसाठी रुग्णालय उभारले. त्यावेळी रवी यांनीही एचआयव्ही रुग्णांसाठी सामाजिक कार्य सुरू केले. त्यांच्या गावातील एचआयव्ही बाधित बालकाचे दुर्लक्षामुळे निधन झाले. त्याच्या अंत्यविधीसाठीही कोणी पुढे येत नव्हते. त्या वेळी रवी आणि त्यांच्या मित्रांनी अंत्यसंस्कार केले. त्याचवेळी रवी यांनी एचआयव्ही बाधित मुलांसाठी कार्य करण्याचे आणि त्यासाठी लग्नही न करण्याचे ठरविले.

लातूरजवळील हासेगाव येथे एचआयव्ही बाधित मुलांसाठी ‘सेवालय’ संस्था सुरू केली. तेथे मित्राकडून साडेसहा एकर जमीन दान मिळाली. तेथे खोली बांधून दोन मुलांचा सांभाळ सुरू केला. त्यामुळे ग्रामस्थांच्या रोषाला तोंड द्यावे लागले. मात्र, अडचणींवर मात करून त्यांनी मुलांना शाळेत पाठवले. ‘सेवालया’पासून जवळच ‘हॅपी इंडियन व्हिलेज’ साकारत आहे. सध्या तेथे ७२ एचआयव्ही बाधित मुले-मुली आहेत. त्यांच्या आई-वडिलांचे एचआयव्हीमुळे निधन झाले आहे. या मुलांचे शिक्षण, निवास, भोजन, औषधोपचार असा संपूर्ण खर्च दानशूरांच्या मदतीतून होतो. 

रवी यांच्या या कार्यात त्यांचे सहकारी स्नेहा शिंदे, शरद झरे सहकार्य करतात. सेवालयातील एचआयव्ही बाधित मुले आपल्या अंतःकरणातील दुःख बाजूला ठेवून विविध ठिकाणी ‘हॅपी म्युझिक शो’ या सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांना जगण्याची नवी ऊर्मी देतात. कार्यक्रमांतून मिळणाऱ्या रकमेवर त्यांचा उदरनिर्वाह होतो. एचआयव्हीसारखा आजार असतानाच आपल्या कला-गुणांनी ही मुले जग जिंकण्यास बाहेर पडली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news Ravi Bapatale HIV