यात्रेतील खर्च टाळून शाळेला मदत

युनूस तांबोळी
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

ग्रामीण भागातील विद्यार्थी सध्याच्या स्पर्धेत टिकत नाहीत. कारण, त्याला मिळणाऱ्या भौतिक सुविधांची कमतरता भासत असते. गावागावातील तरुण मंडळांनी अशा प्रकारे जिल्हा परिषदांतील शाळांना मदत करण्यास पुढाकार घेतला पाहिजे. त्यातून शाळा डिजिटल होण्यास व स्मार्ट विद्यार्थी घडण्यास मदत होऊ शकते.
- सविता बगाटे, सदस्या, जिल्हा परिषद

टाकळी हाजी, ता. 6 ः स्पर्धात्मक युगात शाळा डिजिटल झाल्या पाहिजेत यासाठी पाबळ (ता. शिरूर) फुटाणवाडीच्या नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी श्री गोसावीबाबा यात्रेतील मनोरंजनाच्या कार्यक्रमाला फाटा देत जिल्हा परिषद शाळा डिजिटल केल्या आहेत. यात्रांच्या नाहक मनोरंजनावरील खर्च आता शैक्षणिक कार्यासाठी वापरला जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांची मानसिकता बदलत आहे.

पाबळ (ता. शिरूर) हे गाव तसे दुष्काळी म्हणून ओळखले जाते. येथील थिटेवाडी बंधाऱ्यामुळे शेती क्षेत्रात प्रगती झाल्याने काहीसा बदल झाला आहे. येथील फुटाणवाडीत जिल्हा परिषद प्राथमिक पहिली ते चौथीपर्यंतची शाळा आहे. या वाडीत दरवर्षी श्रीगोसावीबाबा यात्रोत्सव साजरा केला जातो. या यात्रेसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम होत असतो. काही तासांच्या मनोरंजनासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो. या वर्षी मनोरंजनाचा कार्यक्रम रद्द करून एक 40 इंची एलईडी, सीपीयू आणि इ- लर्निंग सॉफ्टवेअरसह सुमारे 57000 रुपये किमतीचा संच शाळेला नागरिकांनी भेट दिला.

या संचाचे उद्‌घाटन श्री गोसावीबाबा तरुण मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रेय बगाटे यांनी केले. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 14 व्या वित्त आयोगांतर्गत मिळालेल्या ओव्हरहेड प्रोजेक्‍टरचे उद्‌घाटन भाऊसाहेब गावडे यांच्या हस्ते झाले. येथील पालकांनी पुढाकार घेत उद्यानातील लॉनसाठी 19 हजार रुपये उपलब्ध करून दिले आहेत. या वेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा संध्या बगाटे, नवनाथ बगाटे, बाळासाहेब वरखडे, कांताराम बगाटे, विष्णूपंत बगाटे, काळूराम फुटाणे, सुहास बगाटे उपस्थित होते. बाल आनंद मेळाव्यास ग्रामस्थांनी 10 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. माजी सरपंच विकास बगाटे यांनी प्रास्ताविक केले. उपशिक्षक आयुब तांबोळी यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापिका गौरी शिंदे यांनी आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news shirur pabal yatra school help