गड-किल्ले सर करणारा शतकवीर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 डिसेंबर 2017

पुणे - सुशील दुधाणे यांनी ९८ गड सर केल्यानंतर शतक जरा ‘हटके’ करण्याचा मानस केला. सह्याद्री पर्वत रांगेतील अवघड मानले जाणारे अलंग, मदन व कुलंग हे गड सर करण्याचे त्यांनी ठरविले. त्यात त्यांना १६ डिसेंबरला यश आले. हे गड सर करून त्यांनी शतक पूर्ण केलेच त्याबरोबर आपली इच्छाही पूर्ण केली. 

याबाबत दुधाणे म्हणाले, ‘‘या गडांवर जाण्यासाठी रॉक क्‍लाइंबिंग, रॅपलिंग करावे लागते, त्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्यावी लागते. मागील वर्षी एव्हरेस्टला निघालेला ट्रेकर भगवान चवले याच्या मदतीने मी हे गड सर करू शकलो. अलंग गडावर दोन रॉक पॅच खूपच अवघड होते. जवळपास ७० ते ८० फुटांची उभी कातळभिंत चढून जावी लागते. शारीरिक क्षमतेचा कस पाहणारा हा गड आहे.

दोन्ही गड फिरून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कुलंग गडाकडे प्रस्थान केले. वाटेत तीव्र उतार लागतो. या ठिकाणी वाट अतिशय निसरडी व अवघड असल्याने झाडाला दोर बांधून त्याच्या सहाय्याने खाली उतरलो. साधारण तासाभराच्या पदभ्रमणानंतर गडाच्या पायथ्याशी पोचलो. गडाच्या दिशेने कातळात खोदलेल्या सुबक पायऱ्या लागतात. पायऱ्या चढून गेल्यानंतर पाऊण तासात गडावर पोचलो. गडाची संपूर्ण फेरी पूर्ण केल्यावर माघारी निघालो. या संपूर्ण गड भ्रमंतीमध्ये ट्रेकर चवलेसह सुनील बलकवडे, तुषार खटाळ, गणेश पांडे, किरण गावडे, शुभम हिंगे यांचे सहकार्य लाभले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news sushil dudhane fort century