कचऱ्यातून फुलवला भाजीपाला

पांडुरंग सरोदे
शुक्रवार, 21 जुलै 2017

पुणे - झुपकेदार रोपाला लगडलेल्या हिरव्यागार मिरच्या...डेरेदार गुलाबाच्या झाडावर आलेली देखणी गुलाब फुले..कुठे वांग्याची झाडे, तर कुठे कारल्याचा वेल...या आणि अशा असंख्य प्रकारची भाजीपाला, फुले आणि फळांची झाडे काही झोपडपट्ट्यांमधील घरांवर, अवतीभोवती फुलली आहेत. घरातल्या रोजच्या कचऱ्याचा वापर करून ही रोपे, झाडे जगविली जात आहे. दुर्गंधी नाही की साधे कीटकही नाहीत. त्याहीपेक्षा सेंद्रिय पद्धतीने होणारा भाजीपाला, फळांचा वापर वस्त्यांमधील नागरिक करू लागले आहेत. तब्बल अडीच हजार झोपडीधारकांच्या पुढाकारातून साकारलेल्या कचरा व्यवस्थापनाच्या या प्रयोगाने पुणेकरांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. 

शहरातील वस्त्यांमध्ये मोठ्या संख्येने राहणाऱ्या झोपडीवासीयांना अन्य दैनंदिन समस्यांइतकेच कचऱ्याच्या समस्येलाही सामोरे जावे लागते. मात्र याच कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास त्यापासून फळे, फुले व भाजीपालाही पिकविता येतो, हे चतुःशृंगीजवळच्या वैदूवाडी या वस्तीमधील महिलांनी दाखवून दिले आहे. त्यांना यार्दी वस्ती विकास प्रकल्पांतर्गत ‘घरगुती ओला कचरा व्यवस्थापना’ची माहिती आणि त्यासाठी आवश्‍यक वस्तू देण्यात आल्या होत्या. त्याचा वापर करूनच विविध वस्त्यांमधील घरांभोवती फळे, फुले व भाजीपाला फुलू लागला आहे.   

शहरातील जनता वसाहत, वडारवाडी, कामगार पुतळा, पाटील इस्टेट, साईबाबा वसाहत, प्रेमनगर, आंबेडकरनगर, कस्तुरबा वसाहत, औदुंबर वसाहत, मातोश्री रमाबाई आंबेडकर वसाहत यांसारख्या अनेक वस्त्यांमध्ये या प्रकल्पाबाबत जनजागृती करण्यात आली होती. आता या वस्त्यांमधील घरांच्या भिंतीभोवती, पत्र्यावर, छतावर किंवा खिडक्‍यांच्या कडेला कुंड्या ठेवून ओला कचरा जिरविण्याबरोबर भाजीपाला, फळे व फुले पिकविली जात आहेत. 

‘यार्दी’च्या सामाजिक बांधिलकी विभागाच्या प्रमुख भारती कोतवाल म्हणाल्या, ‘‘संस्थेतर्फे वस्तीपातळीवर शिक्षण, आरोग्य, स्वच्छता व ओला कचरा व्यवस्थापन या विषयांमध्ये काम केले जाते. ओल्या कचऱ्याविषयी महिलांमध्ये जागृती केली. त्यांना कुंड्या, बायोकल्चर दिले. रोप व झाडे महिलांनी स्वतः आणली. महिलांनी घरातील ओल्या कचऱ्याचा वापर करून कुंड्यांमधील शेती केली आहे. महिलांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन असल्यामुळेच हे घडू शकले.’’

घरामध्ये दररोज एक किलो ओला कचरा निघतो. तो आम्ही घरच्या घरीच कुंड्यांमध्ये जिरवितो. कुंडीत आलेले टरबूज, कांदे, मिरची, कारले भाजीसाठी वापरतो. त्यामुळे दुर्गंधी, कीटकांचा त्रासही संपला आहे.’’ 
- अंजली लोखंडे, गृहिणी 

आम्ही तीन वर्षांपासून ओला कचरा घराबाहेर टाकत नाही. अनेकदा शेजाऱ्यांकडूनही ओला कचरा घेऊन तो कुंड्यांमध्ये टाकतो. या कुंड्यांमधील सेंद्रिय पद्धतीने मिळणारा भाजीपाला अधिक रुचकर लागतो.
- लता लोखंडे, गृहिणी

घरगुती ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन   
१. कुंडीच्या तळाला विटांचे छोटे छोटे तुकडे टाकावेत
२. विटांच्या तुकड्यांवर नारळाच्या शेंड्या पूर्ण पसरून टाकाव्यात
३. नारळाच्या शेंड्यांवर दोन मुठी बायोकल्चर पसरून टाकावे
४. त्यानंतर कुंडीत ओला कचरा, भाजीचे देठ, फुलांचा कचरा टाकावा
५. कुंडीत ओल्या कचऱ्याच्या मधोमध मातीसह रोप लावावे.
६. घरात दररोज निर्माण होणारा कचरा कुंडीत टाकून त्यावर पाणी टाकावे.

कुंडीत काय-काय टाकता येईल? 
भाजीचे देठ, फळांच्या साली, शिळे अन्न, हाडे, अंड्याची टरफले, केसांची गुंतवळ, नखे, पालापाचोळा, नैसर्गिक जैविक पदार्थ, नारळाच्या शेंड्या आदी.

फायदे कोणते
१) दुर्गंधी नाही, कमी पाणी लागते. २) कुंडीतून स्वच्छ पाणी येत असल्याने स्वच्छता राहते. ३) माशा, डास, लाल मुंग्यांचा उपद्रव नाही. ४) मातीच्या तुलनेत या कुंडीत फळे, फुले व भाज्यांचे उत्पन्न खूप होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news vegetables garbage