बंद वाहनांना धक्का देत ‘त्यांनी’ दाखविली माणुसकी

एस. डी. आहिरे
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

समाजात अडलेल्या माणसाला मदतीचा हात देणे, या कर्तव्य भावनेतून हे काम केले. सुमारे शंभरहून अधिक वाहनांमध्ये पुराच्या पाण्यामुळे बिघाड झाला होता. त्यांना सुखरूप बाहेर काढून वेळप्रसंगी गॅरेजपर्यंत पोचविले.
- बापूसाहेब पाटील, अध्यक्ष, अभिनव कला, क्रीडा मंडळ, पिंपळगाव बसवंत

पिंपळगाव बसवंत - वाट चुकलेल्या व्यक्तीला योग्य मार्ग दाखविणे ही आपली जुनी संस्कृती आहे. पिंपळगावच्या काही तरुणांनी याच्याही पुढे एक पाऊल टाकत माणुसकी अद्याप जिवंत असल्याचे दाखवून दिले.

पिंपळगावच्या चिंचखेड चौफुलीवर पुराच्या पाण्यात अडकलेल्या व बंद पडलेल्या वाहनांना धक्का देऊन त्या मार्गस्थ करण्याचे कौतुकास्पद काम अभिनव कला, क्रीडा मंडळाच्या तरुणांनी केले. त्यांच्या या हातभार लावण्याने अनेकांना इच्छितस्थळी पोचता आले.

पिंपळगावची मिठी नदी म्हणून कुख्यात असलेल्या मनाडी नाल्याच्या पुराने पूर्ण बाजारपेठ कवेत घेताना महामार्गावरील चिंचखेड चौफुलीला चार फुटांपर्यंत पाण्याने घेरले. महामार्गाच्या भंडारी संकुलाच्या बाजूने पुराच्या पाण्यात रस्ताच हरविला. उड्डाणपूल उभारणीचे काम सुरू असल्याने पर्यायी मार्ग असलेल्या सर्व्हिस रोडला फुटभर खड्डे पडले आहेत. त्यात पुराचे पाणी म्हणजे जखमेवर मीठ चोळणारे ठरले. नाशिकच्या दिशेने उंबरखेड चौफुलीचा उड्डाणपूल उतरून येणारी वाहने हॉटेल काशिभोजजवळ आली, की करकचून ब्रेक मारावा लागायचा. कारण तेथून ते चिंचखेड चौफुलीपर्यंत पुराचे पाणी होते. अधिक उंच असलेली वाहने वेगाने निघून जात होती, पण कार, दुचाकी रस्त्याच्या मध्यावर आली की बंद पडायची. बंद पडलेल्या वाहनांना काही मदतीचे हात पुढे आले. पावसात वाहनांना धक्का देऊन ते पुराच्या पाण्यातून बाहेर काढत होते. वाहन बंद पडल्याने त्यातील प्रवासी चिंतेत पडत होते. त्यावर ‘काळजी करू नका, आम्ही आहोत’, असा दिलासा हे तरुण देत होते. वेळप्रसंगी जवळच असलेल्या गॅरेजपर्यंत ते वाहन ढकलत होते. पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर पडल्यानंतर वाहनातील प्रवासी त्या तरुणांचे हात जोडून आभार मानत होते.

रस्त्यावरील पाणी ओसरेपर्यंत हे मदतकार्य भरपावसात सुरू होते. विशेष म्हणजे काही व्यक्ती रस्त्याच्या कडेला उभ्या राहून पुरात अडकलेल्या व्यक्तीची टर उडविताना दिसले, पण याउलट अभिनव कला, क्रीडा मंडळाचे बापूसाहेब पाटील, शीतल बुरकुले, संजय विधाते, संजय शिरसाठ आदी १० ते १५ तरुण अडकलेल्या वाहनांचा प्रवास सुसह्य करून देण्याचे स्तुत्य काम करीत होते.

विधायक कार्य करणारे अनेक तरुण मंडळे समाजात आहेत. समाजाच्या अडचणीत धावून जाण्याचे काम ‘अभिनव’च्या सहकाऱ्यांनी केले. रस्त्याच्या कडेला उभे राहून काही व्यकी हसत असताना बापूसाहेब पाटील व त्यांचे सहकारी वाहनांना बाहेर काढत होते.
- संजय महाजन, पोलिस निरीक्षक, पिंपळगाव बसवंत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Flood Water Vehicle Push Humanity