राजनापूर बनतेय सौर ऊर्जापूर्ण गाव

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 September 2020

सौर ऊर्जा प्रकल्पामुळे येत्या २५ वर्षांची वीज बचत होणार आहे. २४ तास अखंडितपणे  वीज असल्यामुळे ग्रामपंचायतीची कामे व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या लाभ होणार आहे.

मूर्तिजापूर (जि. अकोला)  : राजनापूर हे सौर ऊर्जापूर्ण होणारे जिल्ह्यातील पहिले गाव ठरले आहे. पालकमंत्री बच्चू कडू यांनी राजनापूर गावाला पालकमंत्री झाल्यावर पहिली भेट दिली होती. यावेळी गावातील पंतप्रधान व रमाई आवास योजनेच्या माध्यमातून निवड झालेल्या कुटुंबांचा कडू यांच्या उपस्थितीमध्ये गृह प्रवेश  झाला होता. त्याच दिवशी त्यांनी हे गाव दत्तक घेतले. सर्व अधिकाऱ्यांना या गावाचा विकास आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. सध्या छत्तीस लाख रुपयांच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम पूर्ण होत आहे. त्यामुळे  जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी आणि पाणीपुरवठा योजना संपूर्ण सौरऊर्जेवर चालवणारी राजनापूर ग्रामपंचायत ही अकोला जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे.  

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सौर ऊर्जा प्रकल्पामुळे येत्या २५ वर्षांची वीज बचत होणार आहे. २४ तास अखंडितपणे  वीज असल्यामुळे ग्रामपंचायतीची कामे व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या लाभ होणार आहे. सौर ऊर्जेवर चालणारे सोलर  पंप बसवल्यामुळे संपूर्ण गावाला २४ तास  पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे. ग्रामपंचायत, अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळेच्या छतावर सौर पॅनल, अंगणवाडीसाठी  खिचडी शिजवण्यासाठी सौर कुकर, पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवर पाच एचपीचे सौर पॅनेल, गावातील चौकात ४० फुटाचे हाय मास टॉवर, सौर ऊर्जेवर चालणारे सौर पथ दिवे अशी कामे होत आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पालकमंत्र्यांनी गाव दत्तक घेतल्यानंतर गावांमध्ये छत्तीस लाख रुपयांचा सौर ऊर्जा प्रकल्प काही दिवसातच कार्यान्वित होणार आहे.  स्मशानभूमी सुधारणा, राजेश्वर मंदिर सभागृह, दलितवस्ती सभागृह, रस्ते, व्यायामशाळा, अभ्यासिका, अंबामाता तलाव खोलीकरण अशा विविध विकास कामांचे नियोजन आहे.
- प्रगती रुपेश कडू, सरपंच, राजनापूर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajnapur becomes a solar powered village