रिक्षावाल्याच्या पश्चात कुटुंबीयांना सोशल मीडियाने दिला आधार

प्रमोद हर्डीकर
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

  • समीर भाटकर कुंटुंबीयांना मिळवून दिले ८० हजार रुपये,
  • 'एक हात मदतीचा' उपक्रम राबवला

साडवली (रत्नागिरी) : हल्लीची तरुणाई सोशल मीडियावर असते, कामे करत नाहीत अशी नुसती ओरड सुरु असते. मात्र याच सोशल मीडियामुळे चांगले विधायक उपक्रमही सुरू असतात याची प्रचिती देवरुखवासियांना आली आणि देवरुखवासियांनी या उपक्रमाला जोरदार प्रतिसाद देऊन समीर भाटकर याच्या कुंटुंबाला ८० हजार रुपयांचा निधी गोळा करुन दिला. या घटनेमुळे माणुसकी अजुनही जिवंत आहे याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

देवरुख बाजारपेठेतील एक होतकरु व प्रामाणिक रिक्षा व्यावसायिक समीर भाटकर याचे पंधरा दिवसापूर्वी साधा ताप येण्याचे निमित्त होऊन आकस्मिक निधन झाले. या घटनेने त्याने जोडलेला मिञपरीवार हळहळला. समीरच्या अशा जाण्याने शहरवासीय हळहळले. समीरचे वयही केवळ ४०च्या आसपास होते. त्याच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. समीरच्या पश्चात कुंटुंबियांचे हाल होऊ नयेत म्हणून युवा व्यावसायिक आनंद सार्दळ याने काही मदत आपल्याकडून होईल का असा विचार करत मिञमंडळीसह एक हात मदतीचा असे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आले.

समीर भाटकर याचे जनमानसातील असलेले प्रेमाचे स्थान यामुळे मदतीचा एकएक हात पुढेआला आणि ८० हजार रुपयांचा निधी गोळा झाला. श्रद्धांजली फलक, फेसबुक, व्हाॅटसअॅप ग्रुपच्या माध्यमातून अनिल पाटेकर, बाबू भाटकर, प्रसन्न सार्दळ, राजू रेवणे, आशु पुसाळकर, अजित भोपळे, बाबा दामुष्टे, मंदार भाटकर, बंंड्या बोरुकर, अभी शेट्ये, यांनी ही मदत मिळवून दिली. या रकमेतून समीर भाटकर याचे ३५ हजार ५०० रुपये बॅंक कर्ज होते ते देवून टाकले व उर्वरीत रक्कम समीरच्या पत्नीकडे सुपुर्द केली.
समीरच्या कुंटुंबासाठी मिञांनी केलेल्या एक हात मदतीचा एक हात मदतीचा या हाकेला अनेकांनी ओ देवून मदतीचा हात पुढे करुन माणुसकीचे दर्शन घडवले. सोशल मीडियाच्या माध्यमातून विधायक कामे केली जातात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या माध्यामातील अशा एकीतून चांगले काही घडत असते ही ताकद अशीच विधायक कार्यासाठी ही तरुणाई वापरत असते व एका कुंटुंबाचा आधार बनत असते. हा विधायक उपक्रम एक चांगला संदेश देणारा ठरला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ratnagiri news devrukh social media helps needy family