दुर्गम डोंगरात सौरपंपाने फुलली फळबाग!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

शेतकरी डिके यांचा उपक्रम - ५ एकरांत लागवड; २८ पॅनेल्सचा प्लांट
सावर्डे - शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी भरीव सवलतीच्या योजनांद्वारे नवसंजीवनी देत आहे. चिपळूण तालुक्‍यातील मुंढे तर्फ सावर्डे येथील शांताराम लक्ष्मण डिके या शेतकऱ्याने अटल सौर कृषिपंप योजनेचा लाभ घेत फळबागायत फुलवली आहे.

शेतकरी डिके यांचा उपक्रम - ५ एकरांत लागवड; २८ पॅनेल्सचा प्लांट
सावर्डे - शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी भरीव सवलतीच्या योजनांद्वारे नवसंजीवनी देत आहे. चिपळूण तालुक्‍यातील मुंढे तर्फ सावर्डे येथील शांताराम लक्ष्मण डिके या शेतकऱ्याने अटल सौर कृषिपंप योजनेचा लाभ घेत फळबागायत फुलवली आहे.

सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या मुंढे तर्फ सावर्डे गावाच्या डोंगर भागात पाच एकर जंगल भागात फळ लागवड करून फळबाग फुलविण्याचा डिके यांनी केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. जैन इरिगेशन कंपनीने अपारंपरिक  ऊर्जा स्रोत असलेला सौर ऊर्जेवर २८ पॅनेलव्दारे चालणारा प्लांट केवळ साडेअठरा बाय सव्वा तीन मीटर क्षेत्रामध्ये बसवला आहे. ज्या ठिकाणी पायवाट नाही, तेथे पारंपरिक वीज दूरच, अशावेळी सौरपंप हा पर्याय डिकेंनी अंमलात आणून शेतकऱ्यांपुढे आदर्श ठेवला आहे. तीन ते साडेसात अश्‍वशक्ती असलेले सौर कृषिपंप या योजनेच्या माध्यमातून मिळतात.

ज्याची किंमत ३ लाख २४ हजार रुपयेपासून ते ७ लाख वीस हजार रुपयेपर्यंत आहे. यापैकी केवळ १६ हजारांपासून ते ३६ हजार रुपयेपर्यंत अश्‍वशक्तीच्या प्रमाणानुसार केवळ पाच टक्के शेतकरी हिस्सा भरून दुर्गम भागात वीज नसलेल्या ठिकाणी हा सौरपंप बसविता येतो. डिके यांना महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीच्या सावर्डे विभागाचे उपकार्यकारी अभियंता गणेश चांदणे यांनी पाठपुरावा करून तालुक्‍यातील दुसरा सौरपंप प्लॅंट मुंढे तर्फ सावर्डे सारख्या दुर्गम भागात कार्यान्वित केला.

बीएसएनएलमध्ये सेवानिवृत्त झालेला कर्मचारी गावी येऊन शेती फुलवण्याचे ज्वलंत उदाहरण दुर्गम भागातील शेतकऱ्यांसमोर शांताराम डिके यांच्या रूपाने उभे राहिले आहे. मुलगा रोहितला बी. टेक. तर मुलगी पीएच.डी. शिक्षण घेऊन अमेरिकेत स्थायिक झाली असून, मुलांच्या ज्ञानाचा पुरेपुर वापर करून डोंगराळ भागातील शेती माळाचा मळा केला आहे. 

तीन महिन्यांत कार्यान्वित
डिके यांनी डोंगराळ भागात पाच एकर शेतीमध्ये ३२५ आंबा कलमे, ३० कोकम, ३५ आवळा अशा झाडांना डोक्‍यावर हंड्याने पाणी आणत झाडे जगवली आहेत. मोठ्या झालेल्या झाडांना पाणी अपुरे पडत होते. शेतात विहीर खोदली, पण पाणी खोल गेलेल्या विहिरीतून डोंगरावर पाणी पंपाने खेचले जात नव्हते. केंद्र शासनाच्या सौर पंपाची माहिती मिळतात महावितरण कंपनीकडे धाव घेतली. त्या वेळी अधीक्षक अभियंता प्रभाकर पेटकर, मुख्य अभियंता के. व्ही. अंजनाळकर,  कार्यकारी अभियंता प्रकाश जमदाडे व उपकार्यकारी अभियंता जी. एस. चांदणे यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या तीन महिन्यांत सौरपंप प्राप्त झाला.

अपारंपरिक ऊर्जा स्रोतातील सौर कृषिपंप योजना शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. केवळ पाच टक्के शेतकरी हिस्सा भरल्यास शेतकऱ्याला आपल्या शेतात स्वःताचे मुबलक पाणी व शेती पिकवता येईल.
- गणेश चांदणे, उपकार्यकारी अभियंता


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Remote mountains solarpump flouriest horticulture!