ज्येष्ठांना आधार ज्येष्ठांचाच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

अशी करतात मदत 
लिंकरोड चिंचवड येथे राहणाऱ्या एका ज्येष्ठ महिलेला काचबिंदू असून त्यांचेही प्रमाणपत्र भरून दिले. तसेच आजारी ज्येष्ठ महिलेचे प्रमाणपत्र घरी जाऊन भरले. पायाला अपघात झालेल्या ज्येष्ठांचे प्रमाणपत्र भरून दिल्याने ते खूश झाले. कुलकर्णी यांनी एका पेन्शनरला ने-आण करण्याची सोय केल्यामुळे तळेगाव येथील पुष्पलता मतंगे यांच्या निवासस्थानी जाऊन प्रमाणपत्र काढून दिले.

पिंपरी - सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन नियमितपणे सुरू राहण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबरमध्ये हयात असल्याचे (जीवन) प्रमाणपत्र द्यावे लागते.

त्यासाठी ज्येष्ठांना तासन्‌ तास बॅंकेच्या रांगेत थांबावे लागते. निवृत्त कर्मचाऱ्यांची होणारी ही परवड लक्षात घेऊन चिंचवडमधील सुदर्शन नागरिक संघटनेने ज्येष्ठांसाठी घरीच ऑनलाइन प्रमाणपत्र काढून देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. जे लोक घराबाहेर पडू शकत नाहीत, अपंग, अतिवयोवृद्ध, आजारी, निवृत्तांच्या घरी जाऊन त्यांना सेवा दिली जाते. 

ऑनलाइन सुविधा आणि बॅंकांचा डिजिटलकडे असलेला ओढा पाहता केंद्र सरकारने २०१५ पासून निवृत्तिवेतन सुरू ठेवण्यासाठी डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (जीवन प्रमाणपत्र) सुविधा सुरू केली. ते देण्यासाठी पीएफ कार्यालय, महा ई-सेवा केंद्र आणि विविध बॅंकांनी सोय केली. परंतु, बॅंक आणि टपाल खात्यात कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित आहेत. नोव्हेंबरमध्ये त्यांच्या काउंटरवर गर्दी होते. ज्येष्ठांनाही रांगेत उभे राहून प्रमाणपत्र सादर करावे लागते. त्यावर उपाय म्हणून सुदर्शन नागरिक संघटनेचे कार्यवाह विठ्ठल कुलकर्णी, सहकार्यवाह जीवनलाल पटेल यांनी बोटांचे ठसे घेणारे इलेक्‍ट्रॉन यंत्र (बायोमेट्रिक रीडर) खरेदी करून आपणच प्रमाणपत्र काढून देण्याचा विचार सदस्यांपुढे मांडला. संघटनेला पतंजलीचे तालुका प्रमुख डॉ. अजित जगताप, सुरेश गोयल यांनी ते यंत्र दिले. पटेल यांनी इंटरनेटवरून माहिती घेऊन बोटांचे ठसे देऊन ऑनलाइन प्रमाणपत्र भरले व इतरांना सांगितले. त्यानंतर इतरांचेही जीवन प्रमाणपत्र भरले. येथील रुक्‍मिणीबाई रासने सभागृहात सेवा दिली जाते. संघटनेच्या व्हॉट्‌सॲप ग्रुपवर त्यास प्रसिद्धी दिल्याने अशा प्रकारे शहरातील शंभराहून अधिक पेन्शनरांना प्रमाणपत्र मिळवून दिल्याची प्रतिक्रिया कुलकर्णी यांनी व्यक्‍त केली. संघटनेतर्फे ३१ डिंसेबरपर्यंत ही सेवा देण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: retired person pension certificate online humanity initiative