सेवानिवृत्त शिक्षकाकडून गावातील सावित्रीच्या लेकींना...माहेरची साडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

पोहाळे तर्फ आळते - स्वतःच्या घरातील मुलांवर आई-वडील जितके प्रेम करतात, तितकेच प्रेम आपल्या गावातील मुलांवर प्रेम करणारेही पालक आहेत; मात्र पोहाळे तर्फ आळतेतील विश्‍वास श्रीपती काटकर यांनी गावातील वर्षभरात लग्न झालेल्या सावित्रीच्या लेकींना माहेरची साडी देऊन पितृधर्म निभावला आहे

पोहाळे तर्फ आळते - स्वतःच्या घरातील मुलांवर आई-वडील जितके प्रेम करतात, तितकेच प्रेम आपल्या गावातील मुलांवर प्रेम करणारेही पालक आहेत; मात्र पोहाळे तर्फ आळतेतील विश्‍वास श्रीपती काटकर यांनी गावातील वर्षभरात लग्न झालेल्या सावित्रीच्या लेकींना माहेरची साडी देऊन पितृधर्म निभावला आहे. हे करताना गावातील मुलींचे लग्न झाल्यानंतर ती सासरी गेली की माहेरची माया कमी होते, असा गैरसमज आहे. तो खोटा ठरवत सासूरवाशीण मुलींना माहेरपणाचा आधार देणारा उपक्रम काटकर यांनी सुरू केला आहे.

एके दिवशी गावातील महिला डॉक्‍टर गौरी अशोक साळोखे, त्यांचे वडील अशोक साळोखे व काटकर हे तिघे एकत्र येऊन स्त्रीभ्रूण हत्या या विषयावर चर्चा करत होते. 

यावेळी काटकर यांना गावातील मुलींना माहेरची साडी देण्याची कल्पना सुचली. त्यांनी चालू वर्षातील विवाह मुहूर्तापासून ही साडी भेट देण्यास सुरुवात केली. गावात कोणत्याही प्रकारचा जातिभेद न मानता ही साडी देण्याचे काम काटकर व त्यांच्या पत्नी पुष्पा काटकर करत आहेत. लग्न झाले की मुलगी परत माहेरी आल्यावर त्यांना घरी बोलावून तिला गोडधोड खायला घालून हे साडी-चोळीचे वान हे दाम्पत्य देत आहे.

काटकर यांनी ३५ वर्ष शिक्षक म्हणून सेवा केली. २०१० मध्ये ते निवृत्त झाले. शाळेत त्यांनी अनेक गरजूंना शैक्षणिक मदत केली आहे. याबद्दल व उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

समाजात मुलगी हीच सर्वश्रेष्ठ आहे. ती दोन्ही कुटुंबांचा उद्धार करू शकते. गावातील लेकींचा सन्मान करावा, या हेतूने मी माहेरची साडी देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. मी जिवंत असेपर्यंत हा उपक्रम सुरू राहील.
 - विश्वास काटकर,
पोहाळे तर्फ आळते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Retired teacher donate saree to women