सत्यशोधक विवाहातून सचिन, शर्वरी यांचा समाजासमोर आदर्श 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

महात्मा फुले यांच्या सत्यशोधक तत्त्वांचे आचरण करून सचिन आणि शर्वरी यांनी सप्तपदीऐवजी सत्य, प्रेम, विवेक, अहिंसा, श्रम, सदाचार आणि परिवर्तन या सात तत्त्वांना समोर ठेवले व सत्यशोधक विवाह केला.

पुणे - महात्मा फुले यांच्या सत्यशोधक तत्त्वांचे आचरण करून सचिन आणि शर्वरी यांनी सप्तपदीऐवजी सत्य, प्रेम, विवेक, अहिंसा, श्रम, सदाचार आणि परिवर्तन या सात तत्त्वांना समोर ठेवले व सत्यशोधक विवाह केला. त्यातून समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण झाला आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

सचिन आणि शर्वरी, हे दोघेही उच्चशिक्षित आहेत. समाजकार्य करताना प्रजासत्ताकदिनी (26 जानेवारी 2018) विवाह केला होता. विशेष म्हणजे लग्नात आहेर म्हणून "उपयोगी पुस्तके' स्वीकारली. त्या पुस्तकातून केत्तुर (ता. करमाळा, जि. सोलापूर) व ढोलगरवाडी (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) या आपल्या गावी ग्रंथालये निर्माण केली. आज या ग्रंथालयांचा फायदा गरजू विद्यार्थ्यांना होत आहे. 

21 व्या शतकात विवाह सोहळ्यात भपकेबाजी वाढत आहे. हुंडा, कौटुंबिक हिंसा, घटस्फोट यांचेही प्रमाण वाढत आहे. महापुरुषांचा आदर्श विचार समोर ठेवून तो आचरणात आणणारे काहीच जण आहेत. महात्मा फुले यांनी जाती व्यवस्था नष्ट व्हावी, यासाठी केलेले कार्य मोठे आहे. त्यामुळे दोघांनीही आडनावे जातीवाचक असल्यामुळे ती न लावण्याचा निर्णय घेतला. स्त्री-पुरुष समानतेचा विचार करताना ते आपल्या नावापुढे आईचे नाव लावतात. सचिन हे कवी, लेखक असून दोघेही "समाजबंध' ही सामाजिक संस्था चालवित आहेत. स्त्रियांना कापडी सॅनेटरी नॅपकिन मिळावेत, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. महात्मा फुले यांचे विचार ते प्रत्यक्षात आचरणात आणत आहेत. त्यामुळे फुले यांच्या विचारांचे तेच खरे वारसदार असल्याचे स्पष्ट होत आहे. 

लग्न समारंभात अफाट खर्च होतो. अनेकदा कर्जबाजारीपणामुळे आत्महत्येसारखे प्रसंग निर्माण होतात. हे सर्व टाळण्यासाठी सत्यशोधक विवाह होणे गरजेचे आहे. महात्मा फुले यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मी स्वतःही सत्यशोधक विवाह केला आहे. आजच्या पिढीला अशा विवाहांचे आकर्षण वाटते, हे चित्र आशादायी आहे. 
डॉ. हरि नरके, संपादक, महात्मा फुले समग्र वाङ्‌मय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sachin and Sharwari ideal of society