वाळू भरणारा सागर बनला तहसीलदार

प्रताप भोईटे
सोमवार, 4 जून 2018

न्हावरे - पोटाची खळगी भरण्यासाठी चिंचणी (ता. शिरूर) येथील नदीपात्रात वाळू भरणारा तरुण मजूर सागर अरुण ढवळे हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन तहसीलदार बनला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून संघर्ष करीत त्याने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे कौतुक होत आहे. 

न्हावरे - पोटाची खळगी भरण्यासाठी चिंचणी (ता. शिरूर) येथील नदीपात्रात वाळू भरणारा तरुण मजूर सागर अरुण ढवळे हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन तहसीलदार बनला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून संघर्ष करीत त्याने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे कौतुक होत आहे. 

सागरचे प्राथमिक शिक्षण तालुक्‍यातील चिंचणी येथील शाळेत झाले, तर माध्यमिक शिक्षण शिरूर येथे झाले. सागरचे वडील अरुण पक्षाघातामुळे आजारी आहेत, तर आई सुनीता अशिक्षित असून त्या शेतमजुरी करतात. अशी हलाखीची परिस्थिती असून सुद्धा सागरला शिक्षणाची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे त्याने ठेकेदाराकडे नदीपात्रात वाळू उपसण्याचे काम करून त्यामधून त्याने पैशाची जमवाजमव करायला सुरवात केली. मिळालेल्या पैशामधून त्याने पुण्याच्या कृषी महाविद्यालयातून बीएस्सी ॲग्रीचे शिक्षण घेतले. शिक्षण घेताना गावाकडे आला, की तो पुन्हा ठेकेदाराकडे जाऊन वाळू उपसून रोजंदारी करायचा व शिक्षणासाठी पैसे जमवायचा. त्यानंतर त्याने एमपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.या दरम्यान रांजणगाव गणपती येथील औद्योगिक वसाहतीत केटरिंग व्यवसायिकासोबत पंगतीला वाढप्याचेही काम केले. आईने बचत गटाकडून कर्जरूपी मदत करून पाठबळ दिले. त्यानंतर २०१६ पासून त्याने तयारी सुरू केली. मागील वर्षभर पूर्णवेळ  अभ्यास करून तहसीलदारपदाची परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाला. 

माझ्या आई वडिलांना तहसीलदार म्हणजे काय, त्यांचे काम काय हे अद्यापही माहीत नाही. फक्त आमचा पोरगा परीक्षा पास होऊन साहेब झाला एवढेच त्यांना माहीत आहे. अशा अल्पशिक्षित आईवडिलांचा माझ्याबरोबर सत्कार होणे हा माझ्यासाठी मोठा आत्मिक आनंद देणार क्षण आहे.
- सागर ढवळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sagar dhawale tahsildar success motivation