चिंचवडमधील ज्येष्ठाचा गोसेवेचा वसा

पीतांबर लोहार  
सोमवार, 14 जानेवारी 2019

पिंपरी - पिंपरी मंडईत फेरफटका मारताना सत्तरीतील व्यक्ती टाकाऊ भाजीपाला गोळा करताना हमखास दिसते. डोक्‍यावर टोपी, डोळ्यांवर चष्मा, भरदार पांढऱ्या मिशा, हातात रबरी मोजे आणि सोबत लाल रंगाचा तीन चाकी ई-रिक्षा टेम्पो, ही त्याची ओळख. विक्रेत्यांकडील टाकाऊ भाजीपाला गोळा करायचा आणि चिंचवड येथील समरसता गुरुकुलमच्या गोशाळेतील गायींना खाऊ घालायचा हा त्यांनी हाती घेतलेला वसा असून, मोहन गुपचूप असे या व्यक्तीचे नाव आहे. 

टाटा मोटर्स कंपनीतून नऊ वर्षांपूर्वी गुपचूप सेवानिवृत्त झाले. त्यानंतर मंडईतील टाकाऊ भाजीपाला गोळा करून गायींना खाऊ घालायचा, अशी संकल्पना त्यांचे मित्र अनिल कुलकर्णी यांनी मांडली आणि दोघांनी चारा गोळा करण्याचा उपक्रम सुरू केला. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव कुलकर्णी यांना फार दिवस काम करता आले नाही. त्यामुळे गुपचूप यांनी स्वतःच स्कूटरवर जाऊन चारा आणणे सुरू केले. सेवानिवृत्तीची रक्कम मिळाल्यानंतर त्यात साठवलेली रक्कम घालून त्यांनी बॅटरीवर चालणारा तीनचाकी रिक्षा टेम्पो घेतला. दररोज तीनदा ते मंडईत जातात व टाकाऊ भाजीपाला टेम्पोत भरून गोशाळेत घेऊन जातात. 

चिंचवड येथील चापेकर स्मारक समितीच्या व्यायामशाळेत गुपचूप यांनी विनामोबदला प्रशिक्षण दिले आहे. टाटा मोटर्स कामगार पतसंस्था, स्वर्गवासी तात्या बापट स्मृती समितीच्या माध्यमातूनही त्यांनी काम केले आहे. सध्या दररोज पाच ठिकाणच्या फलकांवर ते प्रबोधनात्मक सुविचार लिहीत आहेत. 

गुपचूप म्हणाले, ‘‘सुरवातीला विक्रेत्यांनी विरोध केला. त्यामुळे एका सिंधी बांधवाकडे गेलो. त्यांनी तीन मुस्लिम कुटुंबांशी ओळख करून दिली. त्यांच्याकडून भाजीपाल्याचा कचरा मिळू लागला. हळूहळू अन्य विक्रेतेही तयार झाले. आता ‘कचरा घेऊन जा’ असे स्वतःहून सांगतात. कोबी, फ्लॉवर, मुळा, बिट यांचा पाला हमखास मिळतो. काहीजण खराब भाजीपाला व फळे देतात. काही जण पैसे देतात. त्यातून पेंड व सुग्रास खाद्य विकत घेऊन गायींना पुरवितो. 

एका बॅंकेत आम्ही संयुक्त खाते उघडून गाईसाठी ५० हजार रुपयांची कायम ठेव ठेवली  आहे.’’

गेल्या तीन-चार वर्षांपासून काका गाईसाठी टाकाऊ भाजीपाला घेऊन जात आहेत. सुरवातीला ते स्कूटरवर यायचे व तीन-तीन पोती एकाच वेळेस घेऊन जायचे. त्यांचे काम पुण्याचे असून, त्यांच्यामुळे आम्हालाही गोसेवा करण्याची संधी मिळत आहे. 
- सुरेखा कांगणे, भाजी विक्रेत्या, पिंपरी मंडई

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: samarsata gurukulam goshala in chinchwad