मदतीचा नव्हे...खरोखरचा हात

घन:शाम नवाथे
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

सांगली - ‘‘देणाऱ्याने देत जावे... घेणाऱ्याने घेत जावे... घेता घेता एक दिवस...देणाऱ्याचे हातच घ्यावे’’ असे विंदा करंदीकर कवितेत म्हणतात. कवितेतील हात घ्यावे म्हणजे दातृत्व असे अपेक्षित आहे. परंतु कवितांच्या ओळीचा शब्दश: अर्थ जिल्ह्यातील दिव्यांग मित्र अनुभवत आहेत.

३९ जणांना कृत्रिम हात : दिव्यांग मित्रांचा न्यूनगंड केला दूर

सांगली - ‘‘देणाऱ्याने देत जावे... घेणाऱ्याने घेत जावे... घेता घेता एक दिवस...देणाऱ्याचे हातच घ्यावे’’ असे विंदा करंदीकर कवितेत म्हणतात. कवितेतील हात घ्यावे म्हणजे दातृत्व असे अपेक्षित आहे. परंतु कवितांच्या ओळीचा शब्दश: अर्थ जिल्ह्यातील दिव्यांग मित्र अनुभवत आहेत. जिल्हा परिषदेने एक-दोन नव्हे तर ३९ जणांना मदतीचा नव्हे तर एकप्रकारे जिवंत हातच दिला आहे. दीड ते दोन लाख रुपये किमतीचे हात मोफत बसवले जातील. त्यांच्या जीवनातून न्यूनगंड दूर होऊन त्यांनाही इतरांप्रमाणे मुक्त जीवन जगता येईल.

सलगरेतील सविता आनंदपुरे सांगत होत्या... ‘‘डावा हात कोपऱ्यापासून नव्हता. हात नसल्यामुळे न्यूनगंड निर्माण झाला होता. दिव्यांग मित्र अभियानातून हाताची तपासणी केली. कोपऱ्यापर्यंत स्नायूंमध्ये संवेदना असल्याचे निष्पन्न झाले. कृत्रिम हात बसवण्यानंतर मला गाडी चालवता येईल.’’

शेटफळेतील समाधान गायकवाड म्हणाला... ‘‘२०११ मध्ये रेल्वे अपघातात उजवा हात निकामी झाला. कृत्रिम हात बसवण्याबाबत चौकशी केली. परंतु तो फक्त दिखावूपणासाठीच असल्याचे समजले. त्यामुळे निराश झालो. परंतु आता कृत्रिम हात बसवला गेल्यास विविध हालचाली करता येतील असे निदान झाले. त्यामुळे जगण्याची उमेद वाढली.’’ 

मालगावचे संदीप पाटील म्हणाले... ‘‘लहानपणीच उजवा हात गेला. एका हाताशिवायच जगलो. कृत्रिम हात बसवून हालचाल करता येणे शक्‍य असल्याचे समजले. आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही.’’

पात्रेवाडी (ता. आटपाडी) चा अमर पवार म्हणाला... ‘‘दोन वर्षांपूर्वीच अपघातात डावा हात निकामी झाला. मनाने पूर्ण खचलो. आता कृत्रिम हात मिळणार आहे. आनंदी जीवन जगून काहीतरी करून दाखवण्याची उमेद मिळाली.’’

जिल्हा परिषदेने राबवलेल्या दिव्यांग मित्र अभियानातून ४८ व्यक्तींची कृत्रिम हातासाठी तपासणी केली गेली. त्यापैकी ३९ दिव्यांगांना कृत्रिम हात बसवणे शक्‍य असल्याचे निष्पन्न झाले. एका हाताची किंमत दीड ते दोन लाख रुपये आहे. मुख्यमंत्री 
सहायता निधी व सीएसआरमधून मोफत कृत्रिम हात बसवले जातील. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आणि सर्व सहकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांच्या प्रयत्नातून राज्यात प्रथमच हा अनोखा उपक्रम राबवला जात आहे.

कृत्रिम हात वरदानच
बायोनिक इंडिया हैदराबाद यांच्यामार्फत बसवले जाणारे कृत्रिम हात दिव्यांगांसाठी खरोखरच वरदान आहे. हाताच्या सहाय्याने विविध कामे करताना मदत होईल. किलोपर्यंत वजन उचलणे शक्‍य होईल. गाडी चालवताना बॅलन्ससाठी हाताची मदत होईल.

जिल्हा परिषदेच्या दिव्यांग मित्र अभियानाची मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री यांनी दखल घेतली आहे. कृत्रिम हातासाठी पहिल्या टप्प्यात ५० जणांची तपासणी केली. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित दिव्यांगांची तपासणी केली  जाईल. दिव्यांग मित्रांच्या मदतीसाठी जिल्ह्यातून मोठी चळवळ उभी केली जाईल. यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील पदाधिकारी, सदस्य आणि  अधिकारी यांचे सहकार्य लाभत आहे.
- संग्रामसिंह देशमुख. अध्यक्ष, जिल्हा परिषद, सांगली

२०१४ मध्ये अपघातात उजवा हात निकामी झाला. घरातली कामे करताना अडचणी आल्या. परंतु सर्वांनी धीर देत मदत केली. कृत्रिम हाताची किंमत साडेतीन लाख रुपये असल्याचे समजले. परंतु हाच हात जिल्हा परिषद मोफत देणार आहे.
- शैला नांगरे, निमणी (तासगाव) 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sangli news helps to handicap