तरुणाईने केला शाळेचा कायापालट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

मिरज - सामाजिक ऋणाच्या भावनेतून सिद्धेवाडी (ता. मिरज) येथील तरुणांनी प्राथमिक शाळेत लाखो रुपयांची विकासकामे केली आहेत. राजकीय मतभेद बाजूला ठेवत विधायक कामासाठी एकत्र आलेल्या तरुणाईने हा अाविष्कार घडवला. 

मिरज - सामाजिक ऋणाच्या भावनेतून सिद्धेवाडी (ता. मिरज) येथील तरुणांनी प्राथमिक शाळेत लाखो रुपयांची विकासकामे केली आहेत. राजकीय मतभेद बाजूला ठेवत विधायक कामासाठी एकत्र आलेल्या तरुणाईने हा अाविष्कार घडवला. 

मिरज-पंढरपूर रस्त्यावरील सिद्धेवाडी गावाचा भरीव विकास झालेला नाही. अनेक तरुण शिक्षणानंतर बाहेर पडले. सांगली-मिरजेसह पुण्या-मुंबईलाही गेले. नोकऱ्या आणि व्यापार उदीमात स्थिरावले; पण गावपांढरीची दुरवस्था स्वस्थ बसू देत नव्हती. ही रुखरुख मनात असलेले काहीजण एकत्र आले. स्वबळावर गावात उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. सुरुवात प्राथमिक शाळेपासून केली. आजमितीला लाखो रुपयांची कामे झाली आहेत.

या दिल्या सुविद्या
तरुणांनी वर्गणी व देणग्या गोळा केल्या. काहींनी थेट अवजारे आणि यंत्रसामग्री दिली. क्रीडांगणाचा कायापालट केला. व्हरांड्यासमोर लॉन आणि फुलझाडे लावली. कूपनलिका खोदल्याने चांगले पाणी उपलब्ध झाले; पिण्याच्या पाण्याची सोय झाली. साठवणुकीसाठी नव्या टाक्‍या उपलब्ध केल्या. तारेचे कुंपण मारुन सुरक्षितता निर्माण केली. सरपंच रामचंद्र वाघमोडे यांनीही मदतीचा हात दिला.

उपक्रमात हे झाले सहभागी

या उपक्रमात बापू चव्हाण, धनाजी खोत, दादा धडस, अशोक गरंडे, अमोल शिनगारे, अर्जून खोत, अमोल शेळके, अमोल केंगार, रमेश देवकाते, संदीप माने, जितेंद्र खताळ, सुभाष नाईक, सुभाष खोत, संतोष आंबे, महावीर खोत, मोहन खरात, नागेश पाटील, मारुती चव्हाण, बापू वाघमोडे, सुधीर पवार, ब्रम्हदेव गोयकर, अण्णा खोत आदींनी भाग घेतला. पंचायत समिती सदस्य कृष्णदेव कांबळे, अरविंद गावडे, शामराव खोत, बाळासाहेब धडस, ताजुद्दीन मुलाणी, विष्णू ओमासे आदींनी सहकार्य केले. 

विद्यार्थी परत शाळेत आले
या उपक्रमाचे प्रवर्तक रेवाप्पा खोत म्हणाले, ‘‘शाळेत विकासकामे करण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर अनेक तरुण पुढे आले. शाळेला नवे रुपडे प्राप्त झाले. विद्यार्थी आणि शिक्षकांचा आनंद दुणावला. इंग्रजी माध्यमासाठी बाहेर गेलेले काही विद्यार्थी पुन्हा शाळेत परतले. भविष्यात आणखी उपक्रम राबवणार आहोत.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli News school development by youngster