निराधार भाऊ-बहिणीवर माणुसकीची सावली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

कोकरूड - ढाकेवाडी (ता. पाटण) येथील निराधार बहीण-भावाचे पालकत्व उद्योजक सुरेश रांजवन यांनी स्वीकारून माणूसकीचे अनोखे दर्शन घडविले.

कोकरूड - ढाकेवाडी (ता. पाटण) येथील निराधार बहीण-भावाचे पालकत्व उद्योजक सुरेश रांजवन यांनी स्वीकारून माणूसकीचे अनोखे दर्शन घडविले.

ढाकेवाडीच्या संजना व सागर तानाजी चव्हाण या बहीण-भावांचे आई-वडील ते लहान असतानाच हे जग सोडून गेले. मुले पोरकी झाली. त्यांचे पुढचे आयुष कसे असेल? त्यांना शिक्षण मिळेल का? त्यांना कुणाचा आधार मिळेल का? अशा अनेक चर्चा सुरू होत्या. मुलांची आजीने (आईची आई) संजना व सागर यांना  नऊ वर्षांपूर्वी शित्तूर-वारुण (ता. शाहूवाडी) येथे घेऊन आल्या. त्यांनी मुलांचे संगोपन केले. दोन्ही मुलांना शाळेत घातले. मात्र आजी वयस्क असल्याने तिला रोजीरोटीसाठी काम करणे अशक्‍य झाले.

माझ्यानंतर मुलांचे कसे? त्यांना कुणाचा आधार मिळेल का? अशी चिंता लागून होती. ते ती लोकांसमोर बोलून दाखवायची. ही चर्चा शित्तूर वारुण येथील आनंदराव पाटील यांनी ऐकली. त्यांनी रांजनवाडी येथील उद्योजक सुरेश रांजवन यांना ही माहिती दिली. मुलांची करुण कहाणी ऐकून रांजवन यांनी संजना व सागरच्या आजी, इतर नातेवाईक, शेजारी यांच्याशी चर्चा करून दोघांना पुढील शिक्षणासह सर्व मदत करू, असे सांगितले. त्याला सर्वांनी होकार दिला. त्यानुसार रांजवन यांनी तसे जाहीर केले.

संजना १३ वर्षांची आहे. ती सातवी तर सागर नऊ वर्षांचा आहे. तो तिसरीमध्ये शित्तूर वारुण येथेच शिकत आहेत. श्री. रांजवन शिराळा तालुका व नवी मुंबई येथील खारघर विभागात उद्योजक व दानशूर सामाजिक कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी आतापर्यंत निराधार स्त्री-पुरुष, गरीब खेळाडू, एक हजार वृक्षांची लागवड, नैसर्गिक आपत्तीग्रस्त लोकांना साहित्य व आर्थिक मदत केली आहे. रांजनवाडी येथील पहिली ते सातवीपर्यंतची  जि. प. शाळा दत्तक घेतली आहे. मेणी खोऱ्यात बेटी बचाव अभियान घराघरांत राबवत गेल्या वर्षांपासून या भागात जन्मलेल्या मुलीच्या नावे गावातील पोस्ट ऑफिसमध्ये ५ हजारांची ठेव ठेवतात. असे अनेक उपक्रम त्यांनी सुरू केले आहेत.

संजना व सागर यांना पालन पोषणासाठी दत्तक घेण्याच्या कार्यक्रमावेळी स्वतः सुरेश रांजवन, शितुरचे माजी  सरपंच तानाजी भोसले, आनंदराव पाटील, विकास शिरसट, बाळासाहेब विंकर, अनिल गुरव, संजय पाटील, धनाजी गुरव, किरण पाटील, गणेश आटुगडे आदी प्रमुख उपस्थित होते.
संजना व सागर यांना आई-वडील नाहीत. त्यांची शिकण्याची हिम्मत पाहून बरे वाटले. यापुढील काळात सर्व मदत केली जाणार आहे. मला मुलगी नाही.  संजना ही माझ्या मुलीप्रमाणे राहील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli News Suresh Rajvan social work speical