ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळीच विवाह झाला अन् नवदाम्पत्याने मंदिरातच...

फिरोज तांबोळी
रविवार, 17 मे 2020

गरिबांना मदत व्हावी म्हणून लग्नातील खर्च टाळून आम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रक्कम दिली. कोरोनाच्या आपत्ती काळात दिलेल्या  या मदतीमुळे खूप समाधान मिळत आहे असे नववधू सपना आनंदा शिंदे यांनी नमूद केले.

गोंदवले (जि.सातारा) : लग्न ठरले अन लॉकडाऊन सुरू झाला.पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठरलेल्या दिवशीच अगदी सध्या पद्धतीने लग्नही उरकले. मात्र लग्नातील जेवणावळीचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देऊन गरिबांना 'सपना' तील 'आनंद' मिळवून देण्याचा प्रयत्न नवदाम्पत्याने केला. नरवणे (ता.माण) येथे हा विवाह नुकताच पार पडला.

नरवणे येथील अरुण आणि सुषमा काटकर यांची कन्या सपना आणि खुटबाव येथील कै बाजीराव व फुलाबाई शिंदे यांचा मुलगा आनंदा यांचा विवाह नोव्हेंबर मध्ये ठरला. कुकुडवाड येथील माध्यमिक शाळेत तात्पुरती शिक्षिका असणारी सपना व पुणे येथे नोकरीत असणारा आनंदा यांचा साखरपुडा उरकून मे महिन्यात विवाह करण्याचे देखील ठरले. दोन्ही कुटुंबियांच्या चर्चेतून मे महिन्यातील १४ तारीख विवाहासाठी निश्चित करण्यात आली. लग्नाची तारीख जवळ येताच दोन्ही घरात लग्नाच्या तयारीची धामधूम सुरू झाली.नवरा नवरीसह कुटुंबीय लग्नाचा बार धुमधडाक्यात करण्याची स्वप्न रंगवू लागली अन कोरोनाने या स्वप्नांवर पाणी पाडले. कोरोनाच्या शिरकावामुळे मार्च महिन्यातच सगळीकडे लॉकडाऊन करण्यात आले. थोड्याच दिवसात लॉकडाऊन संपेल ही आशा देखील काही दिवसातच फोल ठरली. परंतु या संधीचे देखील सोने करण्याचा निश्चय वधू पिता अरुण यांनी केला. त्यांनी कन्या सपना हिच्याशी चर्चा केली. विवाह ठरलेल्या दिवशी व ठरलेल्या वेळीच करून लग्नाच्या जेवणावळीचा खर्च गरिबांसाठी वापरण्याच्या निर्णयावर एकमत झाले. वधू पित्याने लगेच वरमाई श्रीमती फुलाबाई यांना याबाबत कल्पना दिली. त्यांनीही लगेच होकार कळविला.
        
नरवणे जवळील जोतिबा मंदिरात विवाह करण्याचे ठरले.त्यानुसार दोन्ही बाजूकडील मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्स सांभाळून सपना आणि आनंदा यांचे नुकतेच शुभमंगल झाले. ठरल्याप्रमाणे जेवणाच्या पंगती टाळण्यात आल्या. या जेवणावळीचा सुमारे पंचवीस हजार रुपयांच्या खर्चाच्या रक्कमेचा डीडी उपस्थित असणाऱ्या दहिवडीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद दीक्षित यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आला. यावेळी नरवणेचे पोलीस पाटील विजयसिह काटकर उपस्थित होते.

केशरी रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी 

गरिबांना मदत व्हावी म्हणून लग्नातील खर्च टाळून आम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रक्कम दिली.कोरोनाच्या आपत्ती काळात दिलेल्या या मदतीमुळे खूप समाधान मिळत आहे.
सपना आनंदा शिंदे,नववधू

लॉकडाऊनमध्येही चक्क ज्ञानेश्‍वरी पारायण 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Couple Donated Twenty Five Thousand Ruppees Chief Minister Fund