esakal | लॉकडाऊनमध्येही चक्क ज्ञानेश्‍वरी पारायण
sakal

बोलून बातमी शोधा

corona

गावागावांत आजही दरवर्षी न चुकता पारायण सोहळे होतात. कोरानामुळे ही परंपरा यंदा खंडीत होतेय की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, जावळी तालुक्‍यातील गांजे गावात मात्र, लॉकडाउनमधील सर्व नियम, अटी पाळत ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा उत्साहात साजरा झाला.

लॉकडाऊनमध्येही चक्क ज्ञानेश्‍वरी पारायण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कास (जि. सातारा) ः गांजे (ता. जावळी) येथे गेली 57 वर्षे सुरू असलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची परंपरा लॉकडाउनमुळे खंडित होते की काय, अशी परिस्थिती असताना हभप अतुल महाराज देशमुख यांच्या नव्या कल्पकतेने पारायण सोहळा संपन्न झाला. ग्रामस्थांना "हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, अडथळ्यांची चिंता कोण करी' याची प्रचिती आली. दररोज सकाळी मंदिरात होणारी काकड आरती, सकाळ-सायंकाळी घरोघरी अध्याय वाचन व सायंकाळी स्पीकरवरुन होणारे प्रवचन अशा भक्तीपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडला. 

जावळी तालुक्‍यात दरवर्षी गावोगावी ज्ञानेश्वरी पारायणे होतात. गांजे गावातही विश्‍वंबरबाबा दिंडी सोहळ्याचे प्रमुख (कै.) हभप भिकोबा महाराज देशमुख यांनी 57 वर्षांपूर्वी या पारायण सोहळ्याला सुरवात केली. तिथपासून अखंडपणे हा सोहळा सुरू आहे. मात्र, यावर्षी कोरोनाचे संकट समोर असल्याने पारायणाची ही परंपरा खंडित होणार, याची काळजी त्यांचे नातू हभप अतुल महाराज देशमुख यांना लागून राहिली होती. त्यातूनच त्यांना एक कल्पना सुचली. 

या संकटावर मात करत पारायण करायचेच, असा चंग बांधून लॉकडाउनचे सर्व नियम पाळून पारायण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पारायणाला बसणाऱ्या सर्व वाचकांनी घरात बसून ज्ञानेश्वरीचे वाचन करायचे, अशी सूचना ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरातील स्पीकरवरून करण्यात आली. सप्ताहात दररोज सायंकाळी मंदिरात अतुल महाराज प्रवचन करत. स्पीकरवरून ग्रामस्थ घरात बसून ते ऐकत होते. दररोज सकाळी मंदिरात अतुल महाराज हे एकटे जाऊन काकड आरती, पूजा करत असत आणि आज किती अध्याय वाचायचे, हे स्पीकरवरून सांगितले जायचे. मग ग्रामस्थ घरात बसून ज्ञानेश्वरीचे पारायण करत होते. 

अशा पद्धतीने सात दिवस गांजे गावात ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण संपन्न झाले. मंदिरात सामाजिक अंतर ठेवून तोंडाला मास्क लावून एक जोडपं पूजेला बसलं आणि "पुंडलिका वरदेव' करत ज्ञानोबा, तुकोबांचा गजर झाला आणि पारायणाची परंपरा अबाधित राखत यावर्षीच 58 वा पारायण सोहळा संपन्न झाला. 

अतुल महाराजांनी या आगळ्या वेगळ्या पारायणाची संकल्पना मांडली. ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला. प्रत्येकाने स्वतःच्या घरात बसून ज्ञानेश्वरी वाचली. प्रवचनेही मन लावून ऐकली. प्रवचनाबरोबर लॉकडाउनचे नियम पाळा, विनाकारण घरातून बाहेर पडू नका, प्रशासनाला सहकार्य करा, असा संदेशही अतुल महाराज देत होते. 

- विजयकुमार सुतार, पंचायत समिती सदस्य, जावळी 

Video : इमर्जन्सी पेशंट... धावाधाव... त्यात डाॅक्टरांची अट... घाबरगुंडी... पुढे काय घडले वाचा

loading image
go to top