नेत्रदानातून १९ जणांना पुन्हा दृष्टी

शनिवार, 2 सप्टेंबर 2017

सातारा - गेल्या दीड वर्षात जिल्ह्यातील तब्बल पाच हजार जणांनी नेत्रदानाचे अर्ज भरून सामाजिक बांधिलकी जपली आहे. तर, नेत्रदानातून १९ जणांना पुन्हा दृष्टी मिळाली आहे.

सातारा - गेल्या दीड वर्षात जिल्ह्यातील तब्बल पाच हजार जणांनी नेत्रदानाचे अर्ज भरून सामाजिक बांधिलकी जपली आहे. तर, नेत्रदानातून १९ जणांना पुन्हा दृष्टी मिळाली आहे.

नेत्ररोपण प्रभावी उपाय
बुबुळातील दोषांमुळे अंधत्व आलेले नागरिक सृष्टी पाहण्यापासून वंचित राहतात. त्यावर नेत्ररोपण शस्त्रक्रिया हा प्रभावी उपाय आहे. या शस्त्रक्रियेत दोष असलेल्या व्यक्तीच्या बुबुळाचा खराब भाग काढून मृत व्यक्तीच्या बुबुळाचा भाग त्या ठिकाणी बसविला जातो. त्यासाठी मरणोत्तर नेत्रदानाची आवश्‍यकता असते. देशात आवश्‍यक नेत्र बुबुळाची संख्या व उपलब्ध होणारे योग्य बुबुळ या संख्येत मोठी तफावत आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने नेत्रदानासाठी पुढे येणे आवश्‍यक आहे. ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग यामध्ये महत्त्वाचा आहे.

पाच हजार अर्ज 
जिल्हा रुग्णालयातील नेत्रचिकित्सा विभागाच्या माध्यमातून दरवर्षी नेत्रदान पंधरवडा साजरा केला जात आहे. या काळात जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांकडून प्रबोधनाच्या माध्यमातून नेत्रदान करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित केले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये गेल्या दीड वर्षात तब्बल पाच हजार नागरिकांनी नेत्रदानाचे अर्ज भरले आहेत. जिल्ह्याची लोकसंख्या पाहता अजूनही मोठ्या संख्येने नागरिकांनी नेत्रदानासाठी पुढे येण्याची आवश्‍यकता स्पष्ट होत आहे.

जबाबदारी मोठी
एखाद्या नागरिकाने मरणोत्तर नेत्रदानाचा अर्ज भरला तरी, त्याच्या मृत्यूनंतर नातेवाईकांची जबाबदारी मोठी आहे. मृत्यूनंतर चार ते सहा तासांत नेत्रगोल काढला तरच त्याचा उपयोग करता येतो. त्यामुळे अर्जदाराच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी तातडीने जवळच्या नेत्रपेढीशी संपर्क साधणे आवश्‍यक आहे. मृत व्यक्तीचे डोळे बंद करून त्यावर ओल्या कपड्याच्या पट्टया ठेवणे, खोलीतील पंखे बंद ठेवणे, डोक्‍याखाली उशी ठेवणे अशी प्राथमिक खबरदारी घेणेही आवश्‍यक असल्याचे नेत्रचिकित्सक डॉ. काटकर यांनी सांगितले.

नेत्रदानासाठी पुढे या...
नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. त्यामुळे व्यक्ती मृत्यूनंतरही डोळ्याच्या माध्यमातून जिवंत राहू शकतो. एक व्यक्तीमुळे दोन अंधांना दृष्टी मिळते. त्यामुळे नागरिकांनी नेत्रदानासाठी मोठ्या संख्येने पुढे यावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई व नेत्रविभाग प्रमुख डॉ. एन. डी. खोत यांनी ‘सकाळ’शी बोलताना केले.

जिल्ह्यातील नेत्रपेढ्या व त्यांचे दूरध्वनी क्रमांक
जिल्हा रुग्णालय, सातारा - ०२१६२-२२६०६६, २३४६५३, २३००८९
नेत्रसंजीवनी, सातारा - ०२१६२-२३१९३१
दिव्यदृष्टी लेझर्स प्रायव्हेट लिमिटेड, सातारा - ०२१६२-२३८१८३
कृष्णा हॉस्पिटल, कऱ्हाड - ०२१६४ - २४१५५६
अनु आय क्‍लिनिक, कऱ्हाड - ०२१६४ - २२३३३७, ९४०४०६९३३६. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: satara news eye donation

टॅग्स