लक्ष वेधतोय आगळा जल योगासनवीर!

संजय शिंदे
बुधवार, 21 जून 2017

नियमित सरावामुळे पाण्याखाली योगासने करू शकलो. पाण्याखाली योगा केल्याने श्‍वसन क्षमता व एकाग्रता अधिक वाढते. 
- ॲड. सुधीर ससाणे, सातारा

सातारा - पाण्यातील नेत्रदीपक जल योगासनांची किमया येथील ॲड. सुधीर ससाणे यांनी साधली आहे. नानाविध प्रकारची जल योगासने व सूर्यनमस्कार करणाऱ्या ससाणे यांना पाहून बघणारेही थक्क होऊन जातात. 

जलतरणाची पहिल्यापासून आवड असणाऱ्या ससाणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेने आयोजिलेल्या तीन किलोमीटर खाडी पोहण्याच्या स्पर्धेत यश मिळवले. त्यांचे आई व वडील पोहणारे होते. त्यामुळे घरातून त्यांना पोहण्याचे बाळकडू मिळाले. बंधू डॉ. मनोहर व दशरथ ससाणे यांनी त्यांना प्रेरणा दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचे आवाहन केल्यानंतर ॲड. ससाणे हे जल योगाकडे वळाले. पाण्यात योगासने करण्याचे कौशल्य त्यांनी आत्मसात केले. सरावाने ते अष्टांगासन, चतुरंगदंडासन, वज्रासन, पद्‌मताडासन, विरासन, वृक्षासन, पद्‌अंगुष्ठानासन, चक्रासन, हलासन, पद्‌मासनात पाठीवर पडून हात जोडणे आदी ४० प्रकारची आसने व सूर्यनमस्कार लिलया करीत आहेत. त्यांची मुलगी डॉ. श्‍वेताही पट्टीची पोहणारी असून, सूर्यनमस्कार स्पर्धेत तिने अनेक बक्षिसे मिळवली आहेत. प्रयत्न व जिद्दीच्या जोरावर कोणत्याही वयात हवे ते साध्य होऊ शकते, याचा प्रत्यय ससाणे यांनी करून दिला आहे. जमिनीवर सहज करता येणाऱ्या हालचाली पाण्यात करता येत असल्याने या योगासन प्रकारांना महत्त्व असल्याचे ससाणे नमूद करतात. जलतरणाने चिरतरुण राहता येते. व्यायाम हा सुदृढ आरोग्याचा मूलमंत्र आहे. प्राणायाम व योगासनांवर भर दिला पाहिजे, असेही त्यांचे म्हणणे आहे. सरावाशिवाय अशा प्रकारची आसने करू नयेत, असे आवाहनही ते करतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: satara news International Yoga Day