पतीला जगण्याचं बळ देणारी "सावित्री' 

संजय साळुंखे
बुधवार, 27 जून 2018

सातारा - आजारपणामुळे पतीला नोकरी सोडावी लागली... त्यातच त्यांच्या औषधांचा खर्च... मुलांचे शिक्षण आणि संसार कसा चालवायचा... एक ना अनेक प्रश्‍न उभे राहिले... तरीही त्या डगमगल्या नाहीत... घरगुती उत्पादने तयार करून सर्वांच्या खर्चाची जबाबदारी उचलली अन्‌ ती समर्थपणे पेललीही... गेली 12 वर्षे ही सावित्री पतीला जगण्याचे बळ देतानाच संसारही चालवत आहेत. 

सातारा - आजारपणामुळे पतीला नोकरी सोडावी लागली... त्यातच त्यांच्या औषधांचा खर्च... मुलांचे शिक्षण आणि संसार कसा चालवायचा... एक ना अनेक प्रश्‍न उभे राहिले... तरीही त्या डगमगल्या नाहीत... घरगुती उत्पादने तयार करून सर्वांच्या खर्चाची जबाबदारी उचलली अन्‌ ती समर्थपणे पेललीही... गेली 12 वर्षे ही सावित्री पतीला जगण्याचे बळ देतानाच संसारही चालवत आहेत. 

साताऱ्यातील उपनगर असलेल्या संभाजीनगरात राहणाऱ्या अंजली संजय ढाणे यांची ही धडपड. बारावीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले आहे. तनिष्का व्यासपीठाच्या त्या सदस्या आहेत. त्यांचे सासर निनाम पाडळी. त्यांना दोन मुले आहेत. पती संजय हे साताऱ्यातील कोल्ड स्टोअरेजमध्ये नोकरीस होते. 2012 मध्ये अचानक त्यांना किडनीचा त्रास सुरू झाला. काही दिवस डायलिसिसही करावे लागले. या त्रासातूनच त्यांना नोकरी सोडावी लागली. आजार नियंत्रणात आला, पण त्यांना आजही औषधोपचारासाठी दरमहा किमान आठ हजार रुपये खर्च करावा लागतो. संजय यांच्या आजारामुळे ढाणे कुटुंब खचून गेले. सासूबाईंच्या पेन्शनशिवाय उदरनिर्वाहाचे दुसरे कोणतेही साधन नसल्याने खर्चाचा प्रश्‍न उभा राहिला. अंजली यांना घरगुती खाद्यपदार्थ बनवण्याची हौस. याच कौशल्याचा वापर करून त्यांनी घरगुती उत्पादने तयार करण्याचे ठरवले. घरगुती ऑर्डर घेतल्या. हंगामनिहाय व्यवसायाचे नियोजन केले. उन्हाळ्यात लोणची, पापड, कुरवड्या, सांडगे बनवले. पावसाळ्यात महिलांची टेलरिंगची कामे केली. गणेशोत्सव व दिवाळीत फराळाचे खाद्यपदार्थ बनवून दिले. मागणीप्रमाणे त्या रुखवतात वापरले जाणारे पदार्थही बनवून देतात. पहाटे सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत त्यांचा हा उद्योग सुरू असतो. पती आणि सासूबाईंची मदत होते. लोक विश्‍वासावर ऑर्डर देतात. कधी-कधी त्या रद्द झाल्यानंतर नुकसानही सोसावे लागते. तरीही महिन्याकाठी त्यांना पाच ते आठ हजार रुपये मिळतात. त्याशिवाय घरगुती गिरणही आहे. त्यावरही त्याच राबतात. या सर्वांतून मिळणाऱ्या फायद्यातून घर खर्च, पती व सासूबाईंच्या औषधाचा खर्च व मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागतो. 

पत्नीवर संसाराचा बोजा पडल्याचे वाईट वाटतंय. आयुष्यात अंजलीने माझ्यासाठी खूप काही केले आहे. माझ्यासाठी ती आधुनिक युगातील सावित्रीच आहे. 
- संजय ढाणे 

 

रात्रं-दिवस कष्ट करावे लागतात. संसाराचा, औषधांचा खर्च भागतो. पण, बचत होत नाही. तरीही कुणाकडे हात पसरावे लागत नाहीत, याचे समाधान आहे. 
- अंजली ढाणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: satara news positive story Anjali Sanjay Dhande story