एकजुटीची अशीही किमया! विंगमध्ये शेतकऱ्यांनी स्वखर्चाने साकारला रस्ता, वाहतुकीचा प्रश्न मिटला

विलास खबाले
Monday, 15 February 2021

विंग येथील पाणंद परिसरातील शेतकऱ्यांनी एकजूट दाखवत तब्बल दीड किलोमीटरचा रस्ता स्वखर्चाने साकारला आहे.

विंग (जि. सातारा) : येथील पाणंद परिसरातील शेतकऱ्यांनी एकजूट दाखवत तब्बल दीड किलोमीटरचा रस्ता स्वखर्चाने साकारला आहे. यापूर्वी केवळ त्याठिकाणी पाऊलवाट होती. रस्ता बांधण्यासाठी दोन पावले मागे सरताना स्वतःच्या जमिनीतून मार्ग काढला. तेथील प्रत्येकाने जमिनी सरकून देत दातृत्व दाखवले. खास करून ऊस वाहतुकीचा प्रश्न त्यामुळे मिटला. 

येथील विंग-पाणंद रस्ता परिसरात कुय्याची पट्टी नावाचा परिसर आहे. त्याठिकाणी केवळ बांधावरून पाऊलवाट होती. त्यामुळे वाहतुकीची गैरसोय होत होती. ऊस वाहतुकीचा प्रश्न नेहमीचाच होता. वाहतूक करताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीला तोंड द्यावे लागत होते. तीन पिढ्या त्यात गेल्यानंतर समन्वयातून मार्ग काढताना त्या परिसरातील शेतकरी एकत्र आले. गेल्या महिन्यात बैठक घेतली. रस्ता साकारताना पहिल्याच बैठकीत यश आले. तातडीने बांधकाम हाती घेतले. खर्चासाठी निधी संकलित केला. रस्ता बांधण्यासाठी प्रत्येकाने दोन पावले मागे सरकत स्वतःच्या जमिनीही सरकून त्यासाठी दिल्या आहेत. 

नोकियातील अखेरच्या दीड हजार कर्मचाऱ्यांनी काय केलं?

साधारण दीड किलोमीटर अंतरात दहा फुटांनी रस्ता त्याठिकाणी साकरण्यात आला आहे. नुकतेच त्यावर मुरमीकरण केले आहे. दुचाकी-चारचाकी वाहतूक त्यावरून आता सुरू आहे. ऊस वाहतुकीचा प्रश्न आता त्यामुळे मिटला आहे. त्या परिसरातील 15 ते 20 एकरांतील ऊस उत्पादकांना त्या रस्त्याचा लाभ कायमस्वरूपी होणार आहे. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. निवास गरूड, बाळासाहेब यादव, ज्ञानदेव यादव, बाबासो यादव, संपत यादव, अधिक यादव, जयवंत पाटील, सुहास गरूड, सुभाष गरूड, बाळकृष्ण यादव, विजय कणसे, आबासाहेब यादव, रमेश यादव यांसह त्या परिसरातील अन्य शेतकऱ्यांनी त्यासाठी परिश्रम घेतले. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Road Built By Farmers At Wing Karad