पैशाचा मोह दूर लोटून ती देते यशाची ‘विद्या’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

सातारा - ती या मातीतीलच. एका शेतकरी कुटुंबात तिचा जन्म झाला. घरची परिस्थिती तशी बेताची. तिने आपले पाय जमिनीवर ठेवले, मात्र नजर कायम उंच यशाकडे ठेवली. पैसे नव्हते पण सोबतीला एक स्वप्न होते. अपरिमित कष्ट घेत तिने आपले हवाई सुंदरी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. ३५ देशांत प्रवास केला. ‘मॅकडॉनल्स’मध्ये नोकरी केली. कष्ट केले. लाखो रुपयांचा पगार मिळत होता. पण, यशस्वी होऊन फक्त स्वतःच मोठे व्हायचे हे तिचे ध्येय कधीच नव्हते म्हणूनच आज लाखातल्या पगाराची नोकरी सोडून तिने देशातील युवकांना यशाच्या शिखरावर पोचविण्याचा ध्यास घेतला आहे. 

विद्या नंदकुमार-सुनीता बोराटे असे तिचे नाव. राष्ट्रीय बास्केटबॉलपटू असलेल्या विद्याचे शानभाग विद्यालय व यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे शिक्षण झाले. लहानपणापासूनच महत्त्वाकांक्षी असलेल्या विद्याने आपण जीवनात खूप मोठे यश मिळवायचे हा दृढ निश्‍चय केला होता. हवाई सुंदरी होण्याचे स्वप्न तिने कुटुंबात बोलून दाखविले अन्‌ तेथेच विरोध झाला. मैत्रिणींनीही तू उंचीने कमी आहेस, तुला रंगरूप नाही तर परिचितांनी हे क्षेत्र चांगले नाही तिकडे जाऊ नकोस, असे हिनवले. परंतु, स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठी तिचा निर्धार पक्का होता. तिने मोठे शहर गाठले. वेळ प्रसंगी अनाथ आश्रमात राहिली.

अवघ्या १७ व्या वर्षी एअरलाईन्समध्ये रुजू झाली. आपल्या यशाचा हा खडतर प्रवास साताऱ्यात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात तिने उलगडला. लोक काय म्हणतील याचा विचार मी केला असता तर आज जे काही आहे ते बनले नसते. आपली मुलगी लिपस्टीक लावते, शॉर्टस्कर्ट घालते या विचाराने माझ्या वडिलांनीही एक वर्ष माझी भेट टाळली. माझ्या विचारांवर मी ठाम राहिले. मागे वळून पाहिले नाही. एमबीएच्या शिक्षणासाठी लंडनला स्थायिक झाले. पुन्हा पुरेसे पैसे नव्हते. कुटुंबात मागायचे नाही असा निर्धार केला होता. दुसरीकडे २१ लाखांचे कर्ज डोक्‍यावर होते. आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर कोणत्याही कामाची लाज बाळगली नाही पाहिजे, हा विचार मनात पक्का होता. तेथे ‘मॅकडॉनल्ड’मध्ये नोकरी मिळाली. वयाच्या २६ व्या वर्षी मार्केटिंग क्षेत्रातील उच्चपदावर माझी नियुक्ती झाली. लाखो रुपयांचा पगार मिळत होता. पैसे मिळविणे हे आपले अंतिम उद्दिष्ट नाही. यामुळेच आपल्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा उपयोग आपल्या भूमीतील युवा वर्गास व्हावा यासाठीच मी मायदेशात परतले. युवकांना यशाची प्रेरणा देण्याचा मार्ग स्वीकारला आहे. तुम्हाला पुढे जायचे असेल तर इतरांना मदत करावी, ही माझी धारणा आहे, असेही विद्याने सांगितले. सध्या साताऱ्यातील काही गरजू मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे. यासाठी तिला भाऊ विनय याची समर्थसाथ लाभल्याचे तिने नमूद केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: satara news vidya nandkumar sunita borate