कुशल व्यवसायाचा ‘श्रीगणेशा’

विशाल पाटील
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

सातारा - पदवीधर... ३९ वेळा सैन्य भरतीत अपयशी... कोणाचा डिप्लोमा, कोणाचा कोर्स, तर कोणी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे... पण, नोकरी मिळतेय कोठे? मग, पाच जणांनी ठरविले व्यवसायाचा ‘श्रीगणेशा’ करायचा... त्यासाठी आवश्‍यक कौशल्य आत्मसात केले. त्यात कौशल्याच्या जोरावर यंदा तीन महिन्यांत तब्बल दोन हजार ७०० गणेशमूर्ती साकारल्या. 

परळी खोऱ्यातील यादववाडी, ठोसेघर परिसरातील हे पाच तरुण. काशिनाथ यादव याने जांभळे विकून त्यातून शैक्षणिक खर्च भागवत पदवीचे शिक्षण घेतले. आर्मीच्या तब्बल २८ भरती, पोलिस कर्मचारी पदाच्या ११ भरतींसाठी प्रयत्न केले. मात्र, पदरी अपयशच पडले. सूरज लोहार याने इंजिनिअरिंग डिप्लोमा केला. पण, अद्याप नोकरी नाही. प्रमोद लोहार याने हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा केला आहे, तर राजू गायकवाड, दीपक वायकर हे पदवीचे शिक्षण घेत आहेत. मात्र, शिक्षण घेतले तरी नोकरी मिळेलच याची शाश्‍वती नाही. मग, बेरोजगार राहायचे का? हा सवाल त्यांना गप्प बसून देत नव्हता.  काशिनाथने श्रीरंग वाईकर यांच्याकडून १९९७ पासून गणपती मूर्ती बनविण्याचे कौशल्य आत्मसात केले. आता अजय व विक्रम वाईकर बंधूसोबत हे सर्वजण मूर्ती घडविण्याचे काम करत आहेत. प्रकल्पग्रस्त असूनही नोकरी मिळत नाही, याचे दु:ख बाजूला सारत त्यांनी हा व्यवसाय सुरू केला आहे. या पाच जणांनी तीन महिन्यांत तब्बल दोन हजार ७०० गणेशमूर्ती साकारल्या आहेत. राजू गायकवाड याने मूर्तीला मणी लावण्याची विशेष कला आत्मसात केली आहे. त्याने लावलेले मणी मूर्तीसाठी ‘डायमंड’च ठरत आहेत. मूर्तींना रंग देण्याची पद्धती, त्यावर सुंदर लावलेले मणी हे त्यांच्या मूर्तींचे आकर्षण ठरत आहे. पाच युवकांनी सुरू केलेला व्यवसायाचा ‘श्रीगणेशा’ अर्थात ‘स्टार्टअप’ इतरांसाठी मार्गदर्शक ठरेल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: satara news youth business